Stock Market: 5 दिवसात गुंतवणूकदारांनी गमावले 17.5 लाख कोटी रुपये

मुंबई – सरलेल्या पाच कामकाजाच्या दिवसात भारतीय शेअर बाजार निर्देशांक तब्बल 5.4 टक्क्यांनी कोसळले. त्यामुळे गुंतवणूकदारांचे या पाच दिवसात 17.5 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. 17 जानेवारीपासून मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 3,300 अंकांनी तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 1,100 अंकांनी कोसळला आहे. गेल्या वर्षी चांगला परतावा देणाऱ्या भारतीय शेअर बाजाराचे निर्देशांक या आठवड्यात का कोसळले आहेत याची कारणमीमांसा करण्यात येत आहे.
जागतिक पातळीवर विक्री
लॉकडाउनच्या काळात अमेरिकेच्या रिझव्हर्व बॅंकेसह इतर बॅंकांनी व्याजदरात कपात करून मुबलक भांडवल उपलब्ध केले होते. त्यामुळे महागाई वाढल्याने आता या बॅंका व्याजदरात वाढ करणार आहेत. त्यामुळे या आठवड्यात अमेरिकेच्या शेअर बाजाराचे निर्देशांक कोसळले. त्याचा परिणाम भारतासह इतर शेअर बाजारावर होत आहे.
तंत्रज्ञान कंपन्या पिछाडीवर
मुबलक भांडवल सुलभतेमुळे बऱ्याच तंत्रज्ञान कंपन्यांची शेअर बाजारावर नफादायक नोंदणी झाली होती. मात्र आता भांडवल सुलभता कमी होणार असल्यामुळे या कंपन्यांचे शेअर कोसळत आहेत. भारतामध्ये फिनो पेमेंट बॅंक, झोमॅटो, पेटीएम इत्यादी कंपन्यांचे शेअर कोसळले आहेत. अमेरिकेतही फिनटेक कंपन्यांचे शेअर कोसळत आहेत.
ओमायक्रोनचा संसर्ग
भारतातील विविध मोठ्या शहरात ओमायक्रॉनचा संसर्ग वेगाने वाढत असल्यामुळे आता बऱ्याच राज्यांनी मोठ्या शहरातील निर्बंधाची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यामुळे वाहतुकीवर आणि व्यापारावर परिणाम होण्याची शक्यता गुंतवणूकदारांना वाटत आहे.
कच्चा माल महाग
बऱ्याच कंपन्यांनी तिसऱ्या तिमाहीचे ताळेबंद जाहीर केले आहेत. त्यामध्ये नफा वाढला असला तरी महागाईमुळे कच्चा माल महाग होत आहे. याचा परिणाम कंपन्यांच्या आगामी ताळेबंदावर होण्याची शक्यता गुंतवणूकदारांना वाटत असल्यामुळे गुंतवणूकदार विक्री करीत आहेत. वाढत असलेल्या क्रुडच्या किमतीचाही शेअर बाजारावर परिणाम होत आहे.
मागणीवर परिणाम
लॉक डाऊननंतर विविध वस्तूंची मागणी वाढेल असे वाटले होते. मात्र विविध कारणामुळे मागणी वाढताना दिसत नाही. उत्सवाच्या काळातही फारशी विक्री झाली नाही. आता महागाई वाढणार आहे. त्याचबरोबर अवकाळी पावसामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. या कारणामुळे गुंतवणूकदार सावध झाले आहेत.