Stock Market: भारतीय शेअर बाजारात दिवसभर तुफान विक्री, निर्देशांक मोठ्या प्रमाणात कोसळले

मुंबई – अमेरिका, युरोप आणि इतर आशियाई देशातून शेअर बाजार कोसळल्याचे वृत्त सकाळी आल्यानंतर भारतीय शेअर बाजारात दिवसभर तुफान विक्री होऊन शेअर बाजार निर्देशांक मोठ्या प्रमाणात कोसळले. भारताची स्थूल अर्थव्यवस्था मजबुत असूनही गुंतवणूकदार त्याकडे दूर्लक्ष करीत असल्याचे वातावरण शेअर बाजारात होते.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेस 1,545 अंकांनी म्हणजे 2.62 टक्क्यांनी कोसळून 57,451 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 468 अंकांनी कोसळून 17,149 अंकांवर बंद झाला. शेअर बाजारात विक्रीचा जोर इतका होता की, सर्वच क्षेत्राचे निर्देशांक कोसळले.
बजाज फायनान्स कंपनीचा शेअर आजा 6 टक्क्यांनी कोसळला. त्याबरोबरच विप्रो, टेक महिंद्रा, टायटन, रिलायन्स इंडस्ट्रीज,एचसीएल टेक या कंपन्यांचे जोरदार विक्रीमुळे अतोनात नुकसान झाले. सकाळी आशियाई शेअर बाजारातून नकारात्मक संदेश झाल्यानंतर शेअर बाजारात विक्री चालू होती. नंतर अमेरिकेचे फेडरल रिझर्व्ह व्याजदरात वाढ करून भांडवल सुलभता कमी करणार असल्याचे वृत्त आले.
त्यानंतर विक्रीचा जोर वाढला. युक्रेन मुद्यावरून अमेरिका आणि रशिया दरम्यानचा संघर्ष वाढण्याची शक्यता असल्यामुळे युरोपीयन शेअर बाजारावर परिणाम झाला. मध्यपूर्वेतील काही देशात संघर्षाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे क्रुडच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकीकडे शेअर बाजार निर्देशांक घसरत असताना क्रुडच्या दरातही वाढ होत आहे. ही भारताच्या दृष्टीकोणातून चिंतेची बाब आहे. रुपयाचे मुल्य 17 पैशांनी कोसळल्यामुळेही निर्देशांकांना आधार मिळाला नाही.
परदेशी गुंतवणूकदारांकडून जोरदार विक्री
अमेरिकेत व्याजदरवाढ होणार असल्यामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांना अमेरिकन कर्जरोख्यातील गुंतवणूक फायदेशीर ठरत आहे. त्यामुळे गेल्या 15 दिवसांपासून परदेशी संस्थागत गुंतवणूकदार विक्री करीत असल्यामुळे शेअर बाजाराच्या निर्देशांकावर परिणाम होत आहे. शुक्रवारी या गुंतवणूकदारानी तब्बल 3,148 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली. सोमवारीही या गुंतवणूकदारांनी बरीच विक्री केली. भारतीय शेअर बाजारात परदेशी गुंतवणूकिचा वाटा 28 टक्के आहे. त्यामुळे ही गुंतवणूक टिकवून ठेवणे गरजेचे झाले आहे.