#RepublicDay | राजपथावर महाराष्ट्राच्या ‘जैवविविधता मानके’ चित्ररथाने जिंकली मने

#RepublicDay | राजपथावर महाराष्ट्राच्या ‘जैवविविधता मानके’ चित्ररथाने जिंकली मने

नवी दिल्ली : ‘अथांग सागर,रम्य किनारे। सह्याद्रीचे उंचकडे॥ गवत फुलांच्या रंगांवरती महाराष्ट्राचा जीव जडे॥…’ या वर्णनासह राज्याच्या जैवविविधतेचे दर्शन घडविणारा महाराष्ट्राचा ‘जैवविविधता मानके’ चित्ररथ आज राजपथावरील पथसंचलनाचे आकर्षण ठरला. महाराष्ट्राच्या सेनाधिकाऱ्यांनी विविध मार्चिंग कन्टीजंटचे नेतृत्व करून राजपथावर राज्याचा गौरव वाढवला.

राष्ट्रपती राम नाथ कोविंद, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अन्य गणमान्य व्यक्तींच्या उपस्थितीत आज राजपथावर 73 वा प्रजासत्ताक दिन सोहळा पार पडला.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशासाठी शहीद झालेल्या वीर सैनिकांच्या स्मरणार्थ इंडिया गेट शेजारील राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे देशवासियांच्या वतीने आदरांजली वाहिली. यानंतर मुख्य मंचावर राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी ध्वजारोहण केले. राष्ट्रगीत व त्यासोबतच 21 तोफांची सलामी देण्यात आली. जम्मू-काश्मीर पोलीस दलाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबू राम यांना अभूतपूर्व शौर्य व बलिदानासाठी सर्वोच्च शौर्य पदक ‘अशोक चक्र’(मरणोत्तर) जाहीर झाले,आज या समारंभात बाबू राम यांच्या पत्नी रिना राणी आणि पुत्र माणिक शर्मा यांनी हा सन्मान राष्ट्रपतींच्या हस्ते स्वीकारला.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे प्रतिबिंब दर्शविणारा विविध फॉर्मेशनमधील 75 विमानांचा फ्लाईंग पास या पथसंचलनाचे खास वैशिष्ट्य ठरले. यावर्षीच्या पथसंचलनात सेनेचे अश्वदल, सीमा सुरक्षा दलाचे उंटदल, रणगाडे, आकाश क्षेपणास्त्र, युध्द टँक,लष्कर,नौदल आणि वायुदलाचे पथ संचलन आणि बँड पथकांचे आकर्षक सादरीकरण उपस्थितांचे आकर्षण ठरले. राजपथावर देशाच्या समृध्द सांस्कृतिक वारसा व शस्त्रसज्जतेसोबतच महाराष्ट्राच्या ‘जैवविविधता मानके’ विषयावरील चित्ररथांसह 12 राज्यांचे चित्ररथ तसेच 7 केंद्रीय मंत्रालयांच्या चित्ररथांनी लक्ष वेधले.

महाराष्ट्राच्या सेनाधिकाऱ्यांचे दमदार नेतृत्व

आजच्या पथ संचलनात मूळच्या महाराष्ट्राच्या असणाऱ्या सेनाधिकाऱ्यांनी विविध युध्द टँकचे नेतृत्व केले. 75 आर्मर्ड रेजिमेंटचे लेफ्टनंट स्वप्निल गुलाले यांनी भारतीय लष्कराच्या ‘अर्जुन’ या मुख्य युध्द टँकचे नेतृत्व केले. तर लेफ्टनंट ऋषिकेश सारडा यांनी आयसीव्हीबीएमपी 2 टँकचे नेतृत्व केले. भारतीय लष्कराच्या व्हिंटेज सिग्नल यंत्रणेचा महत्त्वाचा भाग असलेल्या ‘एचटी 16’ या 14 इलेक्ट्रीकल वारफेयर बटालियन कोर ऑफ सिग्नल यंत्रणेच्या विशेष मॉडेलचे नेतृत्व केले. यावेळी नाशिक येथील आर्टीलरी सेंटरमधील 75/24 पॅक होमटर्ज मार्क 1 या विशेष गनचेही पथसंचलन झाले.

महाराष्ट्राच्या ‘जैवविविधता मानके’ चित्ररथाने जिंकली मने

‘अथांग सागर,रम्य किनारे। सहयाद्रीचे उंचकडे॥

गवत फुलांच्या रंगांवरती महाराष्ट्राचा जीव जडे॥

जपतो आम्ही जैव वारसा, जपतो आम्ही वसुंधरा ॥

झाडे लावू झाडे जगवू हाच आमुचा धर्म खरा॥’

या शब्दांचा प्रसिध्द पार्श्वगायक सुदेश भोसले यांच्या आवाजातील अर्थपूर्ण रचनेसह राजपथावर महाराष्ट्राचा चित्ररथ दाखल झाला. महाराष्ट्राचा हा चित्ररथ पाहून राजपथावर उपस्थितांनी राज्याचा समृध्द जैवविधता वारसाच अनुभवला.

चित्ररथाच्या दर्शनी भागातील ‘ब्ल्यू मॉरमॉन’ फुलपाखराची 8 फूट उंच आणि 6 फूट रूंद पंखांच्या देखण्या प्रतिकृतीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. चित्ररथावर राज्यफुल ‘ताम्हण’चे रंगीत गुच्छ दर्शविण्यात आले. या फुलांवरील छोटया आकर्षक फुलपाखरांच्या लोभस प्रतिकृतीही उठून दिसत होत्या.

चित्ररथावर मोठ्या आकारातील ‘शेकरू’ हा राज्यप्राणी तसेच, युनेस्कोच्या सूचीमध्ये समावेश असलेले ‘कास पठार’ दर्शविण्यात आले. या पठारावर आढळणारे विविध जीवजंतू दर्शविण्यात आले. ‘हरियाल’ पक्षाची प्रतिकृती ,चित्ररथाच्या मागील भागात वृक्षाच्या फांदीवर बसलेल्या राज्यप्राणी शेकरूची प्रतिकृती आणि राज्यवृक्ष ‘आंबा’ ची प्रतिकृतीही उपस्थितांचे आकर्षण ठरले. माळढोक पक्षी, खेकडा तसेच, मासा, वाघ, आंबोली झरा, फ्लेमिंगो, गिधाड, घुबड पक्ष्यांच्या प्रतिकृतींनीही उपस्थितांचे मन जिंकली.

देशव्यापी ‘वंदे भारतम’ नृत्य स्पर्धेद्वारे निवडलेल्या 480 नर्तकांनी यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला महाराष्ट्रातील कलाकारांचाही यात समावेश होता. दृश्य कला पद्धतीचा वापर करून‘कला कुंभ’ हा स्वातंत्र्य लढ्यातील दुर्लक्षित नायकांच्या नावांची यादी असलेल्या प्रत्येकी 75 मीटर लांबीच्या दहा लेखपटांचे प्रदर्शनही यावेळी करण्यात आले.

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.