7 ते १४ एप्रिलपर्यंत समता पर्व

यवतमाळ- महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त समता पर्वचे आयोजन करण्यात आले असून, सर्व समाज बांधवांकरिता ही वैचारिक प्रबोधनाची पर्वणीच ठरणार आहे. वैचारिक मंथनासोबतच यवतमाळ आयडॉल, करिअर्स गायडन्स, युवकांसाठी स्वयंरोजगार मार्गदर्शन, सामान्य ज्ञान स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, रंग भरण स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, समता ऑलिम्पियाड स्पर्धा व महिलांच्या विविध स्पर्धेचे वैचारिक तथा मनोरंजनात्मक कार्यक्रम हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. सांस्कृतिक कार्यक्रम प्रदर्शन, पथनाट्य, एकपात्री प्रयोग, तथा फुले-शाहू-आंबेडकरी गीतांची स्वरांजली, समता विचारवेध सत्रे, एक क्षण गौरवाचा, विविध वैचारिक पर्व होणार आहे. सोबतच ८ एप्रिलला सुप्रसिद्ध गायिका वैशाली माडे व इंडियन आयडॉल आशिष कुलकर्णी यांचा हिट्स ऑफ म्युझिकल शो संयोजक समता पर्व बचत गटाच्या वतीने कार्यक्रम होणार आहे. दि. ७ एप्रिलला समता पर्व प्रतिष्ठानतर्फे महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून समता पर्वचा आरंभ होईल. याच दिवशी सायंकाळी गजल मुशायऱ्याच्या उद््घाटकीय सत्रासह ७ ते १० पर्यंत गझल गायक रुद्र कुमारांची सुमधुर गझल मैफिल शाम -ए- गझल रंगणार आहे.गझल मैफिलीचे निवेदन ख्यातनाम गझलकार किरण कुमार मडावी करणार आहे. दि. ८ एप्रिलला ” हिट्स ऑफ म्युझिकल शो ” चा बहारदार कार्यक्रम संपन्न होणार आहे. दि. ९ एप्रिलला सकाळी ११ वाजता रंग भरण व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ११ एप्रिलला सकाळी महात्मा फुले कृतज्ञता रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता वादविवाद स्पर्धेचे व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून यवतमाळ आयडॉलची दुसरी फेरी होणार आहे. औरंगाबाद येथील आंबेडकरी विचारवंत डॉ. प्रल्हाद लुलेकर यांचे ‘बहुजन संस्कृतीचे जनक महात्मा फुले’ या विषयांवर तर डॉ . प्रभाकर गायकवाड यांचे नव्या शैक्षणिक धोरणावर जाहीर व्याख्यान होणार आहे. दि. १२ एप्रिलला एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून कॉ. संजय भालेराव यांचे संयोजक आहेत. सदर स्पर्धा सेलिब्रेशन हॉल, मेडीकल चौक, यवतमाळ येथे होणार आहे. १३ एप्रिलला समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी यवतमाळ आयडॉलची अंतिम फेरी व विविध स्पर्धा, तसेच भारतीय पारंपरिक वेशभूषा स्पर्धा संपन्न होणार आहे.