१० फेब्रुवारीला सर्व धर्मिय सामूहिक विवाह सोहळा – संजु आधार वाडे

१० फेब्रुवारीला सर्व धर्मिय सामूहिक विवाह सोहळा – संजु आधार वाडे
वाशिम जिल्हा करणार ५०० लेकीचं कन्यादान
फुलचंद भगत
वाशीम:-वाशिम जिल्ह्याचा समावेश हा आकांक्षीत जिल्ह्यांच्या यादीत होतो. इथला शेतकरी, कष्टकरी, मजूरदार वर्ग आस्मानी व सुलतानी संकटांमध्ये भरडून निघत आहे. त्यातच कर्जबाजारीपणामुळे अनेक शेतकरी बांधव आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतात. त्यामुळे उपवर मुला-मुलींचा विवाह घरात आनंदाचा सोहळा वाटत नसून एक मोठी समस्या वाटत आहे. या बाबी पाहता वाशीम जिल्ह्यात सुभद्राआई बहुउद्देशीय संस्था व इतर सामाजिक संस्था, संघटनांच्या माध्यमातून तब्बल ५०० च्यावर व ५० ते ६० हजार मान्यवरांच्या उपस्थितीत सर्वधर्मिय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्याचा संकल्प आहे. हा विवाह सोहळा १० फेब्रुवारी २०२३ ला सकाळी ११.११ मिनीटांनी आयोजित करण्याचे ठरले आहे. या विवाह सोहळ्यामध्ये सहभागी वर-वधू पित्याला कुठल्याही प्रकारचा खर्च येणार नाही, त्यांना अपेक्षीत असलेले पाहुणे मंडळी ते निमंत्रीत करू शकतात. तसेच विवाहाच्या अगोदरील दिवस पर्यंत प्रत्येक धर्माच्या चालीरीती नुसार ते घरीच सर्व संस्कार पार पाडतील. विवाहाच्या दिवशी सहभागी वधू -वरांचा विवाह त्यांच्या परंपरेनुसार पार पडणार आहे. या विवाह सोहळ्यात सहभागी वर-वधूंना अनेक धर्मगुरू, समाजिक कर्तुत्ववान व्यक्तीमत्व, ज्येष्ठ-थोरांचा आशीर्वाद देखील लाभणार आहे. हा विवाह सोहळा वाशीम जिल्ह्यातच नव्हे तर वर्हाड- विदर्भातील देखील अभूतपूर्व सोहळा ठरणार असल्याची माहिती सुभद्राआई बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा मुख्य संयोजक संजू आधार वाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला मंचावर व्यापारी मंडळाचे जिल्हाध्यक्ष जुगलकिशोर कोठारी, वाशिम जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष माधवराव अंभोरे, कुरेशी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष इरफान कुरेशी, जेष्ठ समाजसेवक गोपाळराव आटोटे, भारतीय जैन संघटनेचे प्रदेश प्रतिनिधी शिखरचंद बागरेचा, तरुण क्रांती मंच जिल्हाध्यक्ष निलेश सोमाणी, माहेश्वरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवलाल भुतडा, मारवाडी युवा मंचचे मनिष मंत्री, व्हॅल्युअर संघटना व साईतिर्थ अॅग्रो प्रोड्युसिंग कंपनीचे संचालक रुपेश लढ्ढा, समाजसेवक तरणसिंग सेठी, विदर्भ समाजसेवा संघ व आयएएस मिशनचे देवेंद्र पाटील खडसे, राजपुत करणी सेनेचे प्रदेशाध्यक्ष शामसिंह ठाकुर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष पवन राऊत, बौध्द युवामंचचे विशाल राऊत, मराठा मंडळाचे अॅड. सुरेश टेकाळे, सौ. वैशाली टेकाळे, ग्रामसेवक संघटनेचे धम्मानंद भगत, जि.प. कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष विजय धुमाळे, राज्य समन्वयक ग्रामसेवक संघटनेचे अरविंद पडघन, राज्याचे कोषाध्यक्ष संजीव निकम, ग्रामसेवक संघटनेचे जिल्हा मानद सचिव गौतम वाढे, कर्मचारी महासंघाचे कार्याध्यक्ष रमेशराव गोटे, समाजसेवी रामदास चांदवाणी आदींची उपस्थिती होती.
यावेळी मुख्य संयोजक संजु आधार वाढे यांनी सांगीतले की, ‘चला माझ्या लेकीच्या लग्नाला’ या संकल्पनेतून हा ऐतिहासिक सोहळा सर्वाच्या सहकार्याने व साक्षीने तसेच विविध धर्मगुरुंच्या उपस्थितीत वाशिम या पवित्र नगरीत आयोजीत करण्यात येत आहे. यामध्ये शासनाच्या वतीने मिळणार्या योजनेचा लाभही वरवधुंना मिळणार असून त्यासोबतच विविध संघटना व सामाजीक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मिळणार्या भेटवस्तूही त्यांना प्रदान करण्यात येणार आहेत.
आपल्या लाडक्या लेकीचे लग्न मोठ्या थाटामाटात व्हावे अशी प्रत्येक वधू पित्याची इच्छा असते. त्यासाठी तो आयुष्यभर पोटाला चिमटा घेऊन पै-पै जमा करून बचत करतो. एवढे करूनही वधू पित्याने आपल्या लाडक्या लेकीच्या विवाहाचे जे स्वप्न पाहिले त्या प्रमाणे विवाह कार्य होत नाही. कारण असा भव्य दिव्य विवाह सोहळा मध्यमवर्गीय, हातावर पोट असणार्या वधू पित्यांना सहन होणारा नसतो. मात्र, सामूदायीक विवाह सोहळ्यात अशा भव्य -दिव्य लग्न सोहळ्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. त्यामुळे वधू पित्याने सामूहिक विवाह सोहळ्यात विवाह का पार पाडावा, यासाठी वधू पित्याच्या मनातील काही महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये सामूहिक विवाह सोहळा काळाची गरज असल्याचे अधोरेखीत झाले.
सामुहिक विवाह सोहळ्याची सुरुवात झाली दर्जेदार
सदर पत्रकार परिषदेत दानिश एम्पायरच्या वतीने संयोजक देवेंंद्र खडसे पाटील यांनी प्रत्येक दाम्पत्याला आकर्षक भेटवस्तु तसेच समाजसेवी निलेश सोमाणी यांनी ५१ हजार रुपयाची देणगी यासाठी जाहीर केली. तसेच सहभागी सर्व संघटनेच्या पदाधिकार्यांनी आपल्या मनोगतातून या उपक्रमाला समर्थन देत तनमनधनाने मदत करणार असल्याचे जाहीर केले. सोबतच कारंजा येथील तेजस मंगल कार्यालयाचे संचालक संजय वानखेडे, शिक्षक आमदार अॅड. किरणराव सरनाईक यांनी सुध्दा या उपक्रमाला सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे जाहीर केेले.
सामूहिक विवाह सोहळा का आहे काळाची गरज….
विवाह सोहळा म्हटले की वधू पिता मोठ्या आर्थिक संकटात सापडतो. विवाह सोहळ्यामुळे मध्यमवर्गीय वधू पित्याच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर देखील उभा राहतो. हा कर्जाचा डोंगर डोईजड झाल्यास तो कधीकधी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय सुद्धा घेतो. मात्र, सामूहीक विवाह सोहळ्यात आपल्या लाडक्या लेकीचे लग्न लावल्यास वधू पित्याला कुठलाच खर्च लागत नाही. त्यामुळे कर्जबाजारी होण्याची वेळ देखील येत नाही. त्यामुळे सर्वधर्मिय सामूहिक विवाह सोहळा ही काळाची गरज आहे.
समाजातील मध्यम वर्गासमोरील संकटे…
समाजामध्ये वावरताना आपल्या असे लक्षात येते की, धर्म कुठलाही असो मध्यमवर्गांच्या समस्या सारख्याच असतात. एकीकडे घरात मुलीच्या भव्य दिव्य लग्नाची स्वप्ने पाहिली जातात. मात्र हातावर पोट असल्यामुळे हा खर्च आपल्याला उचलणारा नसल्यामुळे या स्वप्नांचा चुराडा होतो. कुटुंबाच्या दैनंदिन गरजा भागविताना मुलांचे शिक्षण, ज्येष्ठांचे आरोग्य जपणे हे देखील महत्त्वाचे असते. त्यामुळे मध्यम वर्गीय कुटुंबासमोर एक ना अनेक समस्यांचा डोंगर उभा असतो. ह्या सर्व सदमस्यांचे अडथळे पार करून मुला- मुलींचे विवाह पार पाडावे लागतात.
कोरोनाच्या झळांचाही समाजावर मार….
कोरोना या साथीच्या आजाराने अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. घरातील कर्ते पुरुष या आजाराने हिरावून नेले, कुणाचे रोजगार गेले, तर कित्येक कुटुंबे उघड्यावर पडले. बालपणीच कुणाची आई तर कुणाचे वडील हिरावले गेले. त्यामुळे कोरोनाच्या महामारीने समाजापुढे मोठे आर्थिक संकटे उभी केली आहेत. ही बाब पाहता आपल्या लाडक्या लेकीचे लग्न वैयक्तीक स्तरावर न करता सामूहीक विवाह सोहळ्यात केल्यास निश्चितच वधू पित्याला मोठा आधार मिळेल.
वाढत्या महागाईने विवाह सोहळ्यावर आलेल्या मर्यादा…
गेल्या काही वर्षात कोरोनाचे संकट, त्यातच वाढत्या महागाईने सर्वसामान्य कुटुंबाचे महागाईने कंबरडे मोडले आहे. हे कुणा एका कुटुंबावरचे संकट नाही, तर प्रत्येक मध्यमवर्गीय हातावर पोटणार्या कुटुंबाची समस्या झाली आहे. या वाढत्या महागाईच्या संकटात समाजातील प्रत्येक मध्यमवर्गीय कुटुंब भरडल्या जात आहे. त्यातही विवाह सोहळा म्हटला तर होणारा खर्च न विचारलेला बरा.
अनेक शेतकरी बांधवांच्या आयुष्याची शिदोरी असलेला जमिनीचा तुकडा विकावा लागतो. ही वेळ कुणाही वर अथवा वधू पित्यावर येऊ नये, यासाठी सामूहीक विवाह सोहळा ही काळाची गरज आहे.
सामूहीक विवाह सोहळ्यातही आप्तेष्टांचा होणार मान-सन्मान….
प्रत्येक वधू पित्याचे स्वप्न असते की आपल्या लाडक्या लेकीच्या विवाहात कुठलेही आप्तेष्ट, स्वकीय पाहुणे सुटता कामा नये, यासाठी संपूर्ण कुटुंबच जणू कामाला लागते. मात्र, आर्थिक संकटामुळे, वाढलेल्या महागाईमुळे, लग्न समारंभासाठी चांगली जागा उपलब्ध न झाल्यामुळे पाहुण्यांना बोलावण्यात अडचणी येतात. ह्या अडचणींवर उपाय म्हणजेच सामूहीक विवाह सोहळा होय. या विवाह सोहळ्यात देखील वर-वधू पिता त्यांना अपेक्षीत असलेल्या प्रत्येकाला विवाह सोहळ्यास बोलावून यथेच्छ मान-सन्मान करू शकतात. तसेच वधू पित्याला अपेक्षीत असलेली भोजनाची देखील सर्व व्यवस्था केली जाते. त्यामुळे सामूहीक विवाह सोहळा ही काळाची गरज आहे.
नव दाम्पत्यांचाही होणार सन्मान….
सामूहीक विवाह सोहळ्यात कशाचीच कमतरता नसेल, यासाठी आयोजक पूर्णतः काळजी घेणार आहेत. मात्र याचा कोठेही बडेजाव नसेल. या सामूहीक विवाह सोहळ्यात नवरदेवास कपडे, तर वधूचा साडी-चोळी देऊन सत्कार केला जाणार आहे. तसेच गृहोपयोगी साहित्याची भेट दिली जाणार आहे. त्यामुळे वधू पित्याचा या अत्यावश्यक बाबींवर होणारा खर्च टाळला जाणार आहे. त्यामुळे या सामूहीक विवाह सोहळ्यात वधू पित्याने लग्न लावणे गरजेचे आहे.
प्रत्येक धर्माच्या परंपरेनुसार लागणार विवाह….
विवाहासंदर्भात प्रत्येक धर्माच्या चालीरीती वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे या सामूहीक विवाह सोहळ्यात प्रत्येक धर्माच्या चालीरीती नुसारच विवाह पार पाडून प्रत्येकाच्या धार्मिक भावनांना जपले जाणार आहे. ही देखील या सामूहीक विवाह सोहळ्याची मोठी जमेची बाजू असणार आहे. त्यामुळे या सामूहीक विवाह सोहळ्यात जास्तीत जास्त वधू पक्षांसह वर पक्षांकडील मंडळींनी सहभागी होण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.
अभूतपूर्व क्षणांचे साक्षीदार होण्याची संधी….
या सर्वधर्मिय सामूहीक विवाह सोहळ्यात सर्व जाती -धर्मांचे मिळून किमान ५०० विवाह लावण्याचे उद्दीष्ट आयोजकांचे आहे. त्यामुळे या सामूहीक विवाह सोहळ्याची भव्य-दिव्यता आपल्या लक्षात येणार आहे. यापूर्वी जिल्ह्यात कधीही न झालेल्या अशा सामूहीक विवाह सोहळ्याचे साक्षीदार होण्याची संधी वर व वधू पक्षाकडील मंडळीला मिळणार आहे. त्यामुळेच जास्तीत जास्त वर व वधू पक्षाकडील मंडळींनी या सामूदायीक विवाह सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.
या सर्वधर्मिय विवाह सोहळ्यात कोण-कोण होऊ शकतो सहभागी…
या सर्वधर्मिय सामूहिक विवाह सोहळ्यात वाशीम जिल्ह्यातील रहिवासी असलेले प्रत्येक विवाह इच्छूक वर -वधू सहभागी होऊ शकतात. तसेच वाशीम जिल्ह्यातील रहिवासी आहेत परंतु कामानिमित्त बाहेरील जिल्ह्यात राहतात. ज्यांची इच्छा आपल्या वाशीम जिल्ह्यात, आपल्या पाहुण्यांच्या उपस्थितीत विवाह करण्याची आहे. असे प्रत्येक इच्छुक वर -वधू या सामाजिक सर्वधर्मिय विवाह सोहळ्यात नोंदणी करून सहभागी होऊ शकतात.
समाजातील दानशूर व्यक्तीमत्वही करू शकतात मदत….
हा सर्वधर्मिय विवाह सोहळा राजकारणापासून कोसो दूर असलेल्या, केवळ समाजिक भावनेतून निःस्वार्थीपणे काम करणार्या सामाजिक संघटनांच्या माध्यमातून पार पाडला जाणार आहे. मात्र, या विवाह सोहळ्याचे सामाजिक दृष्टीने महत्त्व पाहता, समाजात तळमळीने वावरणार्या इतरही सामाजिक संस्था सहभागी होऊन त्यांच्या परीने या शाही, भव्य -दिव्य विवाह सोहळ्यास मदत करू शकतात. यासंदर्भात वाशीम जिल्ह्यातील प्रत्येक तालुकास्तर, सर्कल स्तरावर मिटींग घेऊन जनजागृती केली जात आहे. त्यामुळे निःसंकोचपणे आयोजकांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
राजकारणापासून दूर असलेल्या या सामाजिक संस्थांचा आहे सहभाग…
विवाह सोहळ्याचे आयोजन सुभद्राआई बहुउद्देशिय संस्था, वाशिम जिल्हा व्यापारी मंडळ, तरुण क्रांती मंच वाशीम, माहेश्वरी वाशीम जिल्हा संघटना, कुरेशी समाज संघटना वाशीम, भारतीय जैन संघटना वाशीम, मराठा मंडळ संघटना वाशीम, संत सावतामाळी संघटना वाशीम, पदवीधर संघटना वाशीम, डाक्टर असोसिएशन, मेडिकल असोसिएशन, बार असोसिएशन, युवा व्यापारी मंडळ, मारवाडी युवा मंच, राजपुत करणी सेना, जि.प. कर्मचारी महासंघ, राज्य ग्रामसेवक संघटना, बौध्द युवा मंच, अखिल भारतीय शिक्षक संघ वाशीम, एम.एच. ३७ ग्रुप वाशीम, धानोरकर फाऊंडेशन धानोरा, शाक्यमुनी मानव प्रतिष्ठाण, अक्सा हेल्थ क्लब मंगरुळपीर, शिवरत्न मित्र मंडळ मंगरुळपीर, निसर्ग स्पर्श फाऊंडेशन, वृत्तवाहिनी संघ वाशीम जिल्हा, मौलाना आझाद बहुउद्देशीय संस्था कोठारी, मंगरुळपीर यांच्यासह अनेक सेवाभावी संघटनांच्या पुढाकारातून हा सर्वधर्मिय विवाह सोहळा पार पाडल्या जाणार आहे. यासंदर्भात नोंदणी करण्यासाठी वरील संघटनांच्या पदाधिकार्यांशी संपर्क साधता येईल. अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी कार्यक्रमाचे संचालन निलेश सोमाणी, प्रास्ताविक जुगलकिशोर कोठारी तथा आभार दत्ता महाले यांनी मानले.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206