संस्कार भारती व अर्बन बँक कर्मचारी संघटनेचे भारतमाता पूजन

राजपथावरील चित्ररथ निर्मात्यांचा सत्कार
विवेकानंद वाचनालयासाठी मदत निधी समर्पित
—————————————————–
यवतमाळ,
प्रजासत्ताक दिनानिमित्त दरवर्षी संस्कार भारती व यवतमाळ अर्बन बँक कर्मचारी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने भारतमाता पूजनाचा भव्य सोहळा आयोजित केला जातो. यावर्षी कोरोनाविषयक नियमांचे पालन करीत हा सोहळा दत्त चौकाऐवजी बँकेच्या गार्डन रोडवरील मुख्य कार्यालयात निमंत्रितांच्या उपस्थितीत घेण्यात आला.
ध्वजवंदनानंतर बँकेच्या वाहनतळ परिसरात झालेल्या छोटेखानी सोहळ्याच्या मंचावर बँकेचे अध्यक्ष अजय मुंदडा, उपाध्यक्ष आशिष उत्तरवार, मुख्य कार्यकारी अधिकारी भगवान गोंटीमुकुलवार, संस्कार भारतीचे अध्यक्ष दत्तात्रय देशपांडे, प्रांत मंत्री प्रा. डॉ. ताराचंद कंठाळे, कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष कैलास राठोड व भारतीय मजदूर संघाचे गजानन वैद्य प्रामुख्याने उपस्थित होते. भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन तथा दीपप्रज्वलन करून सोहळ्यास प्रारंभ झाला. दत्तात्रय देशपांडे यांनी देशभक्तीपर गीत सादर केले.
यावेळी प्रजासत्तादिनाच्या दिल्ली येथील राजपथावरील मुख्य सोहळ्यात महाराष्ट्राचा चित्ररथ साकारणाऱ्या यवतमाळकर कलावंतांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. यामध्ये अनिल मानेकर, भूषण मानेकर, श्रुती मानेकर, भूषण हजारे, रोशन बांगडकर, शुभम ताजनेकर यांचा समावेश होता. सत्काराला उत्तर देताना भूषण मानेकरने आपल्याला लाभलेली ही आव्हानात्मक संधी विक्रमी वेळात पूर्ण करून झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. संस्कार भारतीमुळे विविध कलावंतांशी भेटण्याचा योग येतो. मूर्तीकलेमध्ये कुटुंबाचा वारसा चालवतानाच समाजातील कोणत्याही इच्छुक व्यक्तीला आपण निःशुल्क मूर्तिकाम, रंगकाम शिकवायला सदैव तयार राहू असा विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखवला.
यावेळी दीनदयाल सेवा प्रतिष्ठानच्या वतीने विवेकानंद छात्रावासानजीक उभारण्यात येत असलेल्या स्व. शिवाजी खराटे स्मृती वाचनालयाकरिता कर्मचारी संघटनेच्या वतीने पाच लाखांचा धनादेश दीनदयालचे सचिव विजय कद्रे, उपाध्यक्ष ज्योती चव्हाण, सहसचिव चंद्रकांत बिडवई यांना प्रदान करण्यात आला. शिवाजी खराटे यांनी अर्बन बँक व दीनदयालच्या कामाच्या माध्यमातून सेवेचा आदर्श उभा केल्याचे गजानन वैद्य म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते संस्कार भारतीचे प्रांत मंत्री ताराचंद कंठाळे यांनी याप्रसंगी बोलताना स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात स्वराज्याचे रूपांतर सुराज्यात करण्याकरता नागरिकांनी आपापली जबाबदारी ओळखत कार्य करण्याचे आवाहन केले. देशाला संस्कृती व शौर्याचा समृद्ध वारसा आहे याची आठवण ठेवत आगामी काळात वैभवाच्या उच्चशिखरावर देश असावा याकरिता प्रयत्नांची आवश्यकता विशद केली. प्रास्ताविक कर्मचारी संघटनेचे सचिव अर्जुन खर्च यांनी केले. बँकेचे अध्यक्ष अजय मुंदडा यांनीही याप्रसंगी बँकेची सामाजिक बांधिलकी विशद केली.
या सोहळ्यात अप्रतिम रांगोळी साकारल्याबद्दल भू-अलंकरण विधेच्या प्रांत संयोजक राजश्री कुलकर्णी, रांगोळीकार आचल नरडे यांचे स्वागत करण्यात आले. श्रीराम देशपांडे यांनी संचालन तर आनंद धवणे यांनी आभार मानले. भारतमातेच्या आरतीने सोहळ्याची सांगता झाली.
यावेळी बँकेचे संचालक मोहन देव, डॉ. नितीन खर्चे, मीरा घाटे, प्रमोद धुर्वे, संस्कार भारतीचे प्रांत महामंत्री विवेक कवठेकर, बाल विभाग प्रमुख जयंत चावरे, जीवन कडू, प्रा. डॉ. माणिक मेहरे, आनंद पांडे यांच्यासह बँकेचे अधिकारी, कर्मचारी, यवतमाळातील मान्यवर नागरिक बंधू-भगिनी उपस्थित होते.
छायाचित्र : १) भूषण मानेकर व चमूचा सत्कार करताना बँकेचे अध्यक्ष अजय मुंदडा, आशिष उत्तरवार, मीरा घाटे
२) दीनदयाल संस्थेला वाचनालयासाठी धनादेश देताना कर्मचारी संघटनेचे कैलास राठोड, आनंद धवने, आनंद पांडे
३) भारतमाता पूजन कार्यक्रमात संबोधित करताना प्रा. डॉ. ताराचंद कंठाळे. मंचावर अजय मुंदडा, आशिष उत्तरवार, दत्तात्रय देशपांडे, भगवान गोंटीमुकुलवार, कैलास राठोड, गजानन वैद्य इ.