वारजई – जामवाडीचा झेडपीकडून खेळखंडोबा आम्ही केवळ मतदानच करायचे का? ग्रामस्थांचा सवाल,गुरुदेव'चा पाठपुरावा

वारजई – जामवाडीचा झेडपीकडून खेळखंडोबा
आम्ही केवळ मतदानच करायचे का?
ग्रामस्थांचा सवाल,गुरुदेव’चा पाठपुरावा
यवतमाळ : वारजई हे गाव दारव्हा पंचायत समितीतून यवतमाळ पंचायत समितीमध्ये समाविष्ट व्हावे,यासाठी गुरुदेव युवा संघाने चालविलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले. झेडपी प्रशासनाने आयुक्तांना पत्र पाठवून ही मागणी केली मात्र आयुक्तांनी पुन्हा यात त्रुटी काढून ग्रामस्थांचा अपेक्षाभंग केला.
जामवाडी आणि वारजई ही गट ग्राम पंचायत आहे. दारव्हावरून २६ किमी येणारे वारजई यवतमाळपासून मात्र १८ किमी अंतरावरच आहे तर वारजई आणि जामवाडीचे एकमेकांपासूनचे अंतर केवळ २ किमी इतके आहे. या गट ग्रामपंचायतीत वारजईचे ४ तर जामवाडीचे ३ सदस्य आहेत. खरी गोम म्हणजे
वारजई हे गाव दारव्हा तालुक्यातही येत असल्याने त्या गावास चौदाव्या वित्त आयोगातून निधी मिळतो त्यामुळे गावात बरीच विकासकामे होत आहे मात्र या तुलेनत जामवाडी हे गाव उपेक्षित ठरत आहे.आम्ही केवळ मतदान करायचे आणि सुविधांपासून वंचित राहायचे, असा प्रश्न येथील गावकरी उपस्थित करीत आहे. त्यांच्यावर होणारा हा अन्याय समजताच गुरुदेव युवा संघाचे अध्यक्ष मनोज गेडाम यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे पाठपुरावा चालविला त्यास समाधानकारक यशही आले. सीईओ डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी १८ जानेवारीला ग्रामविकास विभागाच्या अवर सचिवांकडे पत्रातून मागणी केली परंतु, स्वतंत्र ग्राम पंचायत स्थापन करण्याची ही मागणी आहे एका पंचायत समितीमधून दुसऱ्या पंचायत समितीमध्ये वर्ग करण्यासाठी नाही त्यामुळे उपआयुक्तांनी या मागणीची पडताळणी करण्याचे निर्देश झेडपी प्रशासनास दिल्याने ही मागणी पुन्हा रेंगाळत राहण्याची चिन्हे आहे. ग्राम विकास विभागाने या मागणीचा फेरविचार करून जामवाडी गावास स्वतंत्र गावाचा दर्जा द्यावा,अशी मागणी आज गुरुदेव युवा संघाने झेडपी प्रशासनाकडे केली आहे त्यास यश आले नाही तर थेट मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याचा इशारा गेडाम यांनी दिला आहे.