वाघापूर येथे पाइपलाइन फुटून झालेल्या नुकसान भरपाईसाठी युवक काँग्रेस च्या वतीने महारष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात ठिय्या आंदोलन

वाघापूर येथे पाइपलाइन फुटून झालेल्या नुकसान भरपाईसाठी युवक काँग्रेस च्या वतीने महारष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात ठिय्या आंदोलन
यवतमाळ शहरातील वाघापूर परिसरात अमृत पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी लिक झाल्याने परिसर जलमय झाला होता. काशीकर महाराज मंदिराजवळ या योजनेची तपासणी सुरू असताना रात्रीच्या सुमारास जलवाहिनी लिक झाली. त्यामुळे पाण्याचा मोठा प्रवाह परिसरात शिरला. त्यामुळे भर उन्हाळ्यात वाघापूरवासीयांना ‘अमृत’चे पाणी पिण्यास मिळाले नसले तरी पूर मात्र पहावयास मिळाले होते. याबाबत नुकसानग्रस्तांना कोणतीही मदत मिळाली नाही. मदतीपासून वंचित असल्याने शुक्रवारी युवक काँग्रेस च्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.
शहरात वाढीव पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. शहरातील नागरिकांची तहान भागविण्यासाठी ३०२ कोटींची अमृत पाणीपुरवठा योजना केली जात आहे. मात्र सुरूवातीपासूनच ही योजना या – ना त्या कारणाने चर्चेत आहे. नगरसेवकांपासून ते नगराध्यक्षांपर्यंत अनेकांनी योजनेत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला आहे. यापूर्वीही तपासणीदरम्यान टाकळी लगत जलवाहिनी फुटली होती. त्यावेळी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. यानंतर झालेल्या चौकशीत निकृष्ट पाइप वापरल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. परिणामी, पूर्ण जलवाहिनीचे पाइप बदलविण्यात आले. त्यानंतरही तपासणीदरम्यान अनेक वेळा जलवाहिनी लिक झाली. वाघापूर येथील काशीकर महाराज मठाजवळ पाणीपुरवठ्याची मुख्य जलवाहिनीचे तपासणीचे काम सुरू होते. दरम्यान जलवाहिनी फुटली. यामुळे परिसरात भर उन्हाळ्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. रस्त्यावरून अक्षरश: पाण्याचे लोट वाहू लागले. लगतच्या घरांमध्ये पाणी शिरले. परिणामी, घरांमधील जीवनावश्यक वस्तूंसह महत्त्वाचे दस्तावेज वाहून गेले. घरांमध्ये पाणीच पाणी व चिखल जमा झाल्याने नागरिकांची एकच धावपळ उडाली. रस्त्यांवर देखील पाणी जमा झाल्याने वाहन चालविणे देखील अवघड झाले होते. बेंबळा प्रकल्पावरून तब्बल १८ किमी लांबपर्यंत टाकण्यात आलेल्या पाणीपुरवठ्याच्या पाइपलाइनची गुणवत्ताच सदोष असल्याचा ठपका नागपुरातील व्हीएनआयटी या संस्थेने ठेवला आहे. गरजूंना तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी विक्की राऊत युवक काँग्रेस अध्यक्ष यवतमाळ विधानसभा, मंगेश पालकर, राहुल वानखडे, आकाश जयस्वाल, मनोज कोठेकर, अजय जांभुळकर,चंदा राऊत, सुशीला राऊत, सुमित्रा पोटर, निरंजन नागमोडे, उज्वला राऊत, विलास लमतुरे, संतोष उदार, गजानन जाधव, लक्ष्मी मेश्राम, नयतमा, सुमित्रा खडसे, गोपाल राठोड, बाबुलाल पाटील, रंगारी हे उपस्तित होते.