लॉ. वसंतराव धाडवे यांचे कार्य सेवायज्ञातील समिधेप्रमाणे – गोपालबाबा

लॉ. वसंतराव धाडवे यांचे कार्य सेवायज्ञातील समिधेप्रमाणे – गोपालबाबा
दिव्यांगांना सायकल, अंधांना काठी तर महिलांना साडी व शिलाई मशीन वाटप
१९८ जणांची नेत्रतपासणी करुन ५० जणांची उदगिर येथे मोफत नेत्रशस्त्रक्रिया
फुलचंद भगत
वाशिम – लॉ. वसंतराव धाडवे यांनी तळागाळातील रंजल्यागांजल्यामध्ये देव पाहून त्यांना नेहमी मदतीचा हात पुढे केला आहे. त्यामुळे त्यांचे सेवाकार्य हे सेवायज्ञातील समिधेप्रमाणे आहे असे आर्शिवादपर मनोगत रतनगडचे गोपालबाबा यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.

स्थानिक आयुडीपी येथील सावित्रीबाई फुले नर्सिग कॉलेजच्या प्रांगणात जेष्ठ समाजसेवी लॉ. वसंतराव धाडवे यांचा ६६ व्या वाढदिवसानिमित्त २ एप्रिल रोजी विविध सेवाभावी व सामाजीक उपक्रम घेण्यात आले. यानिमित्त आयोजीत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे माजी आमदार तथा राज्यमंत्री श्रीकांत देशपांडे हे होते तर उद्घाटक म्हणून रतनगड येथील गोपाल महाराज यांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार तथा शिपींग कार्पोरेशनचे संचालक विजयराव जाधव, व्यसनमुक्ती सम्राट तथा गोरक्षण संस्था लाठीचे दिलीपबाबा, माजी जि.प. सदस्य तथा माजी सहकारी बँक संचालक राजुभाऊ चौधरी, जेष्ठ पत्रकार माधवराव अंभोरे, प्रा. दिलीप जोशी, डॉ. नानवटे, इंजि. धुमाळे यांची उपस्थिती होती.

प्रारंभी अध्यक्ष, उद्घाटक व प्रमुख पाहूण्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब अांबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. त्यानंतर प्रमुख पाहूण्यांचा लॉ. धाडवे मित्रमंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गरीब विद्यार्थ्यांना गणवेश वाटप, गरीब महिलांना साड्या व शिलाई मशीन वाटप, दिव्यांगांना काठी व सायकलचे वाटप करण्यात आले. त्यानंतर उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालयाचे डॉ. गायकवाड व त्यांच्या टिमच्या वतीने शिबीरात सहभागी १९८ व्यक्तींची नेेत्रतपासणी करण्यात आली व त्यात पात्र एकूण ४८ रुग्णांना मोफत मोतीबिंदु नेत्रशस्त्रक्रियेसाठी उदगिर येथे लक्झरी बसने पाठविण्यात आले. यांचा शस्त्रक्रियेचा संपूर्ण खर्च लॉ. वसंतराव धाडवे मित्रमंडळाच्या वतीने करण्यात येणार आहे.

गोरगरीबांसाठी नेहमी झटणारे समाजसेवी लॉ. वसंतराव धाडवे यांना ६६ वर्ष पुर्ण झाल्याबद्दल त्यांचा प्रमुख पाहूण्यांच्या हस्ते सत्कार करुन त्यांची गुळतुला करण्यात आली व सदर गुळ गरीब व्यक्तींना वाटण्यात आला. यावेळी धाडवे यांनी गोपालबाबा यांचे आशिर्वाद घेतले.
उद्घाटनपर भाषणात गोपालबाबा म्हणाले की, मी सहसा कुठल्याच खाजगी कार्यक्रमाला जात नाही. परंतु लॉ. धाडवे यांचे कार्य पाहून मी प्रभावित झालो. व या कार्यक्रमास उपस्थित राहीलो. धाडवे यांचे सेवाकार्य असेच घडत राहो व त्यांना निरोगी दिर्घायुष्य लाभो असे आशिर्वादपर मनोगत गोपालबाबा यांनी व्यक्त केले.

अध्यक्षीय समारोप करतांना माजी आ. श्रीकांत देशपांडे म्हणाले की, धाडवे यांना मी बर्याच वर्षापासून ओळखतो. ते भाबड्या स्वभावाचे असून ते आपल्या परिश्रमातून व स्वकष्टातून कमावलेल्या पैशातून दिनदुबळ्यांसाठी मदतकार्य करत आहेत. राजकारणामध्ये त्यांना देव देते पण कर्म नेते याप्रमाणे त्यांना अनेक संधी चालुन आल्या. परंतु त्यांनी नितीमत्ता जाग्यावर ठेवून व एकनिष्ठ कार्यकर्त्याचे उदाहरण स्वत:ला घालून देवून आलेली संधी नाकारली. या बाबीचा साक्षीदार मी आहे. त्यासोबतच त्यांनी ९० टक्के समाजकारण व १० टक्के राजकारणाला प्राधान्य देवून आपले संपूर्ण आयुष्य गोरगरीबांच्या आनंदासाठी वाहून घेतले आहे. त्यामुळे धाडवे हे खरे समाजसेवक असल्याचे प्रतिपादन श्रीकांत देशपांडे यांनी केले.

यावेळी राजुभाऊ चौधरी, माधवराव अंभोरे, प्रा. दिलीप जोशी, दिलीपबाबा आदींनी आपल्या मनोगतातून धाडवे यांच्या सेवाकार्याची प्रशंसा केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रविण धाडवे, सुत्रसंचालन मयुर राऊत यांनी तर आभार प्रदर्शन सौ. चंचल खिराडे यांनी केले. या कार्यक्रमास धाडवे यांचे चाहते तथा लाभार्थी बहूसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालय, लॉ. वसंतराव धाडवे मित्रमंडळ, लॉयन्स क्लब प्रिन्स तसेच सावित्रीबाई फुले नर्सिग कॉलेजचे कर्मचारी व विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेेतले.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206