'लसीकरण लकी ड्रॉ बक्षीस वितरण सोहळा' बुधवारी मनपाच्या अधिकृत फेसबुकवरून लाईव्ह प्रक्षेपण

आरती आगलावे
चंद्रपूर तालुका प्रतिनिधि
चंद्रपूर, ता. २५ : महानगरपालिका क्षेत्रातील लसीकरणाची टक्केवारी वाढावी व नागरिकांना लसीकरणास प्रोत्साहन मिळावे, यासाठी आयोजित लसीकरण बंपर लकी ड्रॉचा पुरस्कार वितरण सोहळा बुधवार दिनांक २६ जानेवारी रोजी महापौर सौ. राखी संजय कंचर्लावार यांच्या हस्ते होत आहे. कोविड निर्बंधामुळे हा सोहळा मर्यादित व्यक्तींच्या उपस्थितीत होत असून, मनपाच्या अधिकृत फेसबुकवरून लाईव्ह बघता येईल.
चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे आयोजित लसीकरण लकी ड्रॉ बक्षीस वितरण सोहळा राणी हिराई सभागृहात दुपारी १२ वाजता होईल. कार्यक्रमाला उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती संदीप आवारी, आयुक्त विपीन पालीवाल तसेच पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांची उपस्थिती राहणार आहे.
कोविड लसीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी दि. १२ नोव्हेंबर ते २० डिसेंबर २०२१ दरम्यान बंपर लकी ड्रॉ उपक्रम घेण्यात आला. या योजनेस मोठा प्रतिसाद मिळाला. ता. २४ डिसेंबर रोजी सोडत काढण्यात आली. यात प्रथम बक्षीस भाग्यश्री गजभिये यांना फ्रिज, दुसरे बक्षीस विनोद लाडे यांना वॉशिंग मशीन, तिसरे बक्षीस रामप्रसाद बिस्वास यांना एलईडी टीव्ही जाहीर करण्यात आली. याशिवाय १० मिक्सर ग्राइंडर प्रोत्साहनपर बक्षिस विजेत्यांत रणजित कुळसंगे, सुनीता शेंडे, उमा मोहुर्ले, तिरुपती झाडे, अरविंद मानकर, कल्पना तारगे, ताराबाबू सिडाम, राम मोघे, हरीश्चन्द्र दोगडे, चेदीलाल गुप्ता यांचा समावेश आहे. दरम्यान, लसीकरण लकी ड्रॉच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण महानगरपालिकेच्या https://www.facebook.com/CMCchandrapur/ फेसबुक पेजवरून करण्यात येणार आहे.