महिलांची सुरक्षा ही समाजाची जबाबदारी – विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

महिलांची सुरक्षा ही समाजाची जबाबदारी – विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई : लैंगिक भेदभाव नष्ट करून समानता प्रस्थापित करणे, तसेच सामाजिक, घरगुती अन्याय व अत्याचार यांच्याविरुद्ध कठोर कायदे व उपाययोजना करणे, त्याचबरोबर महिलांना शारीरिक, सामाजिक, आर्थिक व मानसिक स्वरूपात सशक्त बनविणे ही समाजाची जबाबदारी आहे, असे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

राज्य महिला आयोगाच्या स्थापनेस 29 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण केंद्रातील ‘रंगस्वर सभागृहात’ वर्धापनदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास खासदार सुप्रिया सुळे, महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर , महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर,पोलीस महासंचालक संजय पांडे, महिला आयोगाच्या सदस्य सचिव अनिता पाटील, माविमच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी आदी उपस्थित होते.

उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या, महिलांवरील अत्याचाराला आळा बसण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘शक्ती फौजदारी कायदे सुधारणा’ विधेयकाला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाची मंजुरी मिळाली आहे. या विधेयकाचे कायद्यात रूपांतर होण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. एकल महिलांबाबत धोरणात्मक निर्णय घेणे, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पत्नींना ओळखपत्र यासारख्या विविध मागण्या आहेत. महिलांच्या सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या महिला आर्थिक विकास महामंडळ, राज्य महिला आयोग यांना निधी द्यावा. याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पत्र देण्यात येणार आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने सन 2020 ते 2030 ही दहा वर्ष ‘डिकेड ऑफ ॲक्शन’ म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे शाश्‍वत विकासासाठी कृती करायची आहे. महिलांना त्यांचे प्रश्न कुठे मांडायचे याची माहिती झाली पाहिजे. प्रत्येक कार्यालयात महिलांसाठी स्वच्छतागृह असले पाहिजे. राज्य महिला आयोगाने समुपदेशन केंद्र सुरू करावे, असेही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, महाराष्ट्रात समाजकारणात व राजकारणात महिलांचे मोठे योगदान आहे. पूर्वीच्या काळी महिलांना समान अधिकार मिळत नव्हते. कोणत्याही सामाजिक परिवर्तनाची सुरुवात महाराष्ट्रातूनच होते. जिल्ह्यातील जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत तीन टक्के निधी कायमस्वरूपी देण्याचा निर्णय शासनाने घेतल्याबद्दल त्यांनी शासनाचे आभार मानले.

महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी यावेळी महिलांच्या सुरक्षा, समस्या व सुविधांसाठी कार्यरत असलेल्या निर्भया पथक, भरोसा सेल, दामिनी पथक, विशाखा पथक, भरारी पथक, बिट मार्शल यांची माहिती दिली. या कार्यक्रमात राज्यभरातील महिलांसाठी टोल फ्री 155209 क्रमांकाचे तसेच महिला आयोगाने तयार केलेल्या कॅलेंडर व डायरीचे देखील अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. महिलांसाठीचा हा टोल फ्री क्रमांक लवकरच कार्यान्वित होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या कार्यक्रमास महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा श्रीमती प्रियांका सावंत, श्रीमती निर्मला सामंत-प्रभावळकर, महिला आयोगाच्या माजी सदस्य सचिव अ.ना. त्रिपाठी,तसेच महिला आयोगाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी तर आभार दीपा ठाकूर यांनी मानले.

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.