मराठमोळ्या गीत संगीताने रंगला यवतमाळातील सांज पाडवा

मराठमोळ्या गीत संगीताने रंगला यवतमाळातील सांज पाडवा

मराठमोळ्या गीत संगीताने रंगला यवतमाळातील सांज पाडवा

• संस्कार भारती व बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे आयोजन

• ‘मी मराठी’ गीतावरील अप्रतिम नृत्य, पोतराजनृत्य आणि श्रीरामाच्या पोर्ट्रेट रांगोळीने वेधले रसिकांचे लक्ष

——————————————–

यवतमाळ,

ललित कलांना समर्पित अखिल भारतीय संस्था संस्कार भारती तथा बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालय, यवतमाळच्या संयुक्त विद्यमाने गुढीपाडव्याच्या संध्याकाळी मराठमोळ्या गीत, संगीत, नृत्य तथा रांगोळीने ‘सांज पाडवा’ कार्यक्रम रंगला. येथील शिवाजी नगरातील बाबाजी दाते कला आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या सोहळ्यास यवतमाळचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी ललित कुमार वर्‍हाडे, उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी, तहसीलदार तथा दंडाधिकारी कुणाल झाल्टे, वाणिज्य महाविद्यालयाचे उपाध्यक्ष वास्तुशिल्पी सतीश फाटक, महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. कल्पना देशमुख, अर्बन बँकेचे अध्यक्ष अजय मुंधडा, संस्कार भारतीचे प्रांत उपाध्यक्ष प्रशांत बनगीनवार, प्रांत महामंत्री विवेक कवठेकर यावेळी मंचावर प्रामुख्याने उपस्थित होते.

प्रारंभी अतिथींच्या हस्ते नटराज पूजन व गुढी पूजनाने झाला. यावेळी साधयति संस्कार भारती भारते नवजीवनम्’ या संस्कार भारती ध्येयगीतावर शिल्पा थेटे, आचल बारड व ईशा हिरुळकर व या कलावंतानी नृत्याविष्कार सादर केला. त्यानंतर झालेल्या औपचारिक सोहळ्यात विदर्भ संस्कार भारतीच्या ‘कलावैदर्भी’ या डिजिटल वार्तापत्राचे अतिथींच्या हस्ते विमोचन करण्यात आले. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक सांस्कृतिक केंद्राच्या गव्हर्निंग बॉडीवर महाराष्ट्रातील एकमेव सदस्य म्हणून लोककला विधेचे प्रांत संयोजक आनंद कसंबे नियुक्त झाल्याबद्दल त्यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी संबोधित करताना डॉ. दिलीप भुजबळ पाटील यांनी रांगोळीद्वारे अनेकांना ओळखीची असणारी संस्कार भारती कलेच्या विविध क्षेत्रांमध्ये काम करताना कलावंतांना प्रोत्साहित करते आणि नवनवीन कार्यक्रमांचे आयोजन करते याबद्दल कौतुक करून नववर्षाच्या सर्व कलावंत रसिक व नागरिकांना शुभेच्छा दिल्या. प्रांत भू-अलंकरण प्रमुख राजश्री कुळकर्णी यांनी रामनामाचा वापर करून चितारलेली चित्रं अतिथींना भेट दिली.

त्यानंतर झालेल्या रंगारंग कार्यक्रमात नृत्य विधेच्या शिल्पा व निशिकांत थेटे यांच्या मार्गदर्शनात स्वराली थेटेने तराणा सादर केला. मोहन भालदंड यांनी सादर केलेल्या पोतराजने प्रेक्षकांना लोकनृत्याची वेगळीच अनुभूती दिली. भैरवी भोयर, विधी शिरपूरकर, हर्षिका अहीर, अनन्या शेटे, परी परडके, सिद्धी चांदेकर, लुब्धा माकोडे, अनिता लोखंडे, ममता वितोंडे, प्रीती कुंभारे, अश्विनी जोशी, वैदेही उडाखे, अनवी परडखे यांनी एकाहून एक सरस नृत्ये करून रसिकांचे उत्कंठावर्धन केले.

डाॅ.. माणिक मेहरे व अपर्णा शेलार यांच्या संयोजनात झालेल्या सांगीतिक मैफिलीचा प्रारंभ भक्ती जोशीने ‘पद्मनाभा नारायणा’ गाऊन केला. त्यानंतर स्वरांगिणी कुडमेथेने ‘पांडूरंग नामी लागलासे ध्यास’, मंथन गादेवारने ‘विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती’,

अर्चना संत यांनी ‘विजय पताका श्रीरामाची’ तर अर्चना ठाकरेने ‘पाहूनी रघुनंदन सावळा’ सादर करून वाहवा मिळविली. पुढे रिद्धी कांडूरवारचे ‘धाकामधला मोहन माझा’, दत्तात्रय देशपांडे यांनी ‘काही बोलायाचे आहे’ आणि शुभलक्ष्मी कुळकर्णीचे ‘खरा तो प्रेमा’ या एकाहून एक सरस गीतांनी सांज पाडव्यात रंग भरले.

त्यानंतर ‘अधीर मन झाले’ हे गीत साक्षी काळे, ‘रूपेरी वाळूत’ अदिती भीष्म आणि ‘जेव्हा तुझ्या बटाना’ राजू कोळमकर व ‘चिंब पावसानं रान झालं’ हे द्वंद्व गीत मोहिनी व चंद्रशेखर कुडमेथे यांनी सादर करून रसिकांचे मन जिंकले.

यानंतर अंजली सरुरकरने ‘माझिया मना’, प्रिया कांडूरवारने ‘शारद सुंदर चंदेरी राती’, मयूर आकळेने ‘पाहिले न मी तुला’, अपर्णा शेलारने ‘केव्हा तरी पहाटे’ तर प्रा. डॉ. माणिक मेहरे यांनी ‘उगवली शुक्राची चांदणी’ ही अप्रतिम लावणी सादर केली.

या गीतांना सिंथेसायझरवर विशाल रामनगरिया, ऑक्टोपॅडवर सहारे, संवादिनीवर चंद्रकांत राठोड, तबल्यावर सचिन वालगुंजे, बासरीवर आकाश सैतवाल, तालवाद्यावर चंद्रशेखर सवाने यांनी सुरेख साथ केली.

मी मराठी या सुप्रसिद्ध गीतावरील नृत्याने श्रोते व प्रेक्षकांच्या उपस्थितीने तुडुंब भरलेल्या प्रांगणात तीन तासपर्यंत चाललेल्या सांज पाडव्याची सांगता झाली.

कार्यक्रमाचे ओघवते संचालन डॉ. कल्याणी देशपांडे यांनी केले. दत्तात्रय देशपांडे यांनी प्रास्ताविक तर डाॅ. ताराचंद कंठाळे यांनी आभार प्रदर्शन केले. जीवन कडू, अनंत कौलगीकर, जयंत चावरे यांनी स्वागत केले. अरुण लोणारकर यांनी श्रीरामाची पोर्ट्रेट रांगोळी तर राजश्री कुळकर्णी, स्वाती बनसोड, जान्हवी रानडे, आयुषी कार्लेकर, अभिजित भीष्म यांनी स्वागताची भव्य रांगोळी रेखली.

कार्यक्रमास माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर, विशुद्ध संस्थेच्या सहसचिव शर्मिला फाटक, संचालक विजय कासलीकर, प्रा. विवेक देशमुख, न.मा.जोशी, डॉ. नारायण मेहरे, प्राचार्या डॉ. रेखा महाजन, प्रभाकरराव देशपांडे, राजेंद्र डांगे, राजू पडगीलवार, कीर्ती राऊत यांच्यासह रसिकांच्या उपस्थितीने प्रांगण फुलले होते.

Updated : 4 April 2022 5:42 AM GMT

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.