पोलीस अधिकाऱ्यांना कोर्टात हजर होण्याचे आदेश ॲट्रॉसिटी चे प्रकरण बोरोले यांची माहिती

पांढरकवडा : सामाजिक कार्यकर्ते रजनीकांत बोरेले यांनी दोन कोटींचा मानहानीचा दावा दाखल केल्याच्या प्रकरणात न्यायालयाने जिल्हा पोलीस अधीक्षक, तत्कालीन एसडीपीओ, तुकाराम गेडाम, एपीआय प्रकाश डाबरे, शिपाई सुरेश कांबळे यांना २९ एप्रिलला न्यायालयात हजर होण्याचे आदेश दिले आहे.
रजनीकांत बोरेले यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०११ मध्ये पोलीस शिपाई सुरेश सखाराम कांबळे यांनी पांढरकवडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्यावरून पोलिसांनी रजनीकांत बोरेले, लक्ष्मीकांत बोरेले, अजय बोरेले यांच्याविरुद्ध भादंवि ३५३ व ३,१, (१०), अॅक्ट्रॉसिटी अॅक्ट अन्वये गुन्हे दाखल करून २०१२ मध्ये न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. २०१८ मध्ये केळापूर येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने एसडीपीओ तुकारामगेडाम, एपीआय प्रकाश डाबरे, फिर्यादी शिपाई, सुरेश कांबळे यांच्यासह अनेकांची साक्ष नोंदविली होती. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद, पुराव्यांचा अभ्यास करून अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. के. तिखले यांनी रजनीकांत बोरेले, लक्ष्मीकांत बोरेले, अजय बोरेले यांची ३ जुलै २०१८ रोजी निर्दोष मुक्तता केली होती. पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केल्याने रजनीकांत बोरेले, लक्ष्मीकांत बोरेले, अजय बोरेले यांनी दोन कोटींच्या मानहानीच्या दाव्याची नोटीस दिली होती. उत्तर समाधानकारक नसल्याने बोरेले यांनी केळापूर अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात एसपी.सी.एस./७२०२२ अन्वये २८ फेब्रुवारी रोजी मानहानीचा दावा दाखल केला. न्यायालयाने १ मार्च रोजी या प्रकरणात पोलीस अधीक्षक, तुकाराम गेडाम, प्रकाश डाबरे, सुरेश कांबळे यांना २९ एप्रिल रोजी हजर राहण्याचे आदेश बजावले आहेत.