पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते बीड येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण सर्वसामान्य माणसाच्या आर्थिक उन्नतीसाठी शासन, प्रशासन व लोकप्रतिनिधी एकजुटीने काम करू – पालकमंत्री धनंजय मुंडे

पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते बीड येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण

सर्वसामान्य माणसाच्या आर्थिक उन्नतीसाठी
शासन, प्रशासन व लोकप्रतिनिधी एकजुटीने काम करू – पालकमंत्री धनंजय मुंडे

बीड शहर प्रतिनिधि सय्यद मिनहाज मो नं 9750317777

बीड, दि. 26, (जि. मा. का.) : मागील दोन वर्षांच्या कालखंडात जिल्ह्याने कोरोनासह अभूतपूर्व पाऊस व त्यामुळे आलेला महापूर देखील पाहिला. अशा संकटांवर मात करुन आपण आता प्रगतीकडे वाटचाल करत आहोत. स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव साजरा करताना विकासाच्या प्रक्रियेत मागे राहिलेल्या वंचित-मागास बांधवांना सगळ्यांबरोबर संधी मिळावी, यासाठी काम केले जात आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्य माणसाच्या आर्थिक उन्नतीसाठी शासन, प्रशासन व लोकप्रतिनिधी एकजुटीने काम करून जिल्ह्याचा विकास करू, अशी ग्वाही राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आज येथे दिली.

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त बीड येथील पोलीस मुख्यालय मैदानावर झालेल्या मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभानंतर नागरिकांना उद्देशून केलल्या भाषणात त्यांनी ही ग्वाही दिली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा शिवकन्या शिरसाट, आमदार संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार, अपर जिल्हा पोलिस अधीक्षक सुनिल लांजेवार, जिल्हा परिषद सभापती यशोदाबाई जाधव यांच्यासह प्रमुख मान्यवर, पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी आदि निमंत्रित उपस्थित होते.

प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देऊन पालकमंत्री धनंजय मुंडे म्हणाले, कोरोना काळात अनाथ झालेल्या जिल्ह्यातील 15 बालकांच्या पालकत्त्वाची जबाबदारी शासनाने स्वीकारली आहे. माता व पिता गमावलेल्या अल्पवयीन मुलांचे भविष्य घडविण्यासाठी प्रत्येकी एकूण 15 लक्ष रुपये तरतूद करण्यात आली आहे. तसेच, एक पालक गमावलेल्या 927 बालकांना बालसंगोपन योजनेतून 1100 रुपये दरमहा दिले जात आहेत. कोरोना आपत्तीमध्ये व्यक्ती गमावलेल्या कुटुंबांना प्रत्येकी 50 हजार रुपये मदत देण्याची प्रक्रिया सुरु आहे. जिल्ह्यातील 1460 कुटुंबांना याचा लाभ देण्यात येत आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.

जनतेला कोरोना संसर्गाच्या छायेतून बाहेर काढण्यासाठी बीड जिल्ह्यात गाव-तांड्यांच्या पातळीपर्यंत लसीकरण शिबिरे घेण्यात आली, असे स्पष्ट करून पालकमंत्री धनंजय मुंडे म्हणाले, बीड जिल्ह्यात पुन्हा सातत्याने पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत सगळ्यांनी नियमांचे पालन करुन, मास्कचा वापर करुन, लसीकरण करुन घेऊन साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

पालकमंत्री धनंजय मुंडे म्हणाले, देशात प्रथमच बीड जिल्ह्यात खरीप हंगामात पावसामुळे झालेल्या सोयाबीनच्या नुकसानीसाठी विम्याच्या 25 टक्के म्हणजे 150 कोटी रुपये रक्कम अग्रीम म्हणून देण्यात आली. प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून सुमारे साडेसहा लाख शेतकऱ्यांना जवळपास 277 कोटी रुपये पीकविमा वितरण पूर्ण झाले आहे.

यावेळी ते पुढे म्हणाले, वीज बिल भरले नसल्यामुळे कनेक्शन तोडण्यात आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ‘कृषीपंप वीज जोडणी धोरण 2020’ घोषित केले आहे. आतापर्यंत पावणे चार लाख शेतकऱ्यांनी याचा लाभ घेऊन आपले वीज बिल कोरे केले आहे. कृषीपंपधारक शेतकऱ्यांनी यामध्ये सहभागी होऊन वीज बिल व्याज विलंब व आकार शुल्कात सवलतीचा लाभ घ्यावा व आपली वीज जोडणी पूर्ववत करुन घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.

कोरानाच्या पार्श्वभूमीवर आजचा समारंभ अत्यंत साधेपणाने पार पडला. ध्वजारोहणा नंतर पोलीस दलाच्या सशस्त्र पोलिस पथकाने पालकमंत्री धनंजय मुंडे यांना मानवंदना दिली. ध्वजारोहण समारंभानंतर पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते राज्य राखीव पोलीस दलाचे पोलीस निरीक्षक पांडुरंग प्रकाशराव दलाई यांना केंद्रीय गृहमंत्री पदक प्राप्त झाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. महात्मा ज्योतीराव फुले व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना मध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या रुग्णालयांना प्रशस्ती पत्रक देवून सन्मानित करण्यात आले. यामध्ये जिल्हा रुग्णालय बीडच्या वतीने डॉ. सुरेश साबळे आणि स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय समन्वयक डॉ. नितीन चाटे व सौ. केशरबाई सोनाजीराव क्षीरसागर रुग्णालयाचे ह्रदयरोग तज्ज्ञ डॉ. अरुण बडे यांना सन्मानित करण्यात आले. यानंतर पालकमंत्री श्री. मुंडे यांच्या हस्ते महाज्योती अभियान अंतर्गत टॅबचे प्रातिनिधीक स्वरुपात वितरण विद्यार्थी कृष्णा वाघ आणि ‍विद्यार्थिनी हर्षदा दिवटे यांना करण्यात आले.

सूत्र संचालन पोलीस दलाचे अनिल शेळके यांनी केले. ध्वजारोहण समारंभास अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांच्यासह सर्व शासकीय विभागांचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी, नागरिक उपस्थित होते. यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, उपस्थित मान्यवर व नागरिक यांची भेट घेऊन पालकमंत्री श्री. मुंडे यांनी शुभेच्छा दिल्या.

Updated : 26 Jan 2022 10:00 AM GMT

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.