धर्म आणि स्त्री

धर्म आणि स्त्री

जाकीर हुसेन – 9421302699

आज आठ मार्च. संपूर्ण जगभरात महिलांच्या सन्मानासाठी,उत्थानासाठी,प्रगतीसाठी, सुरक्षिततेसाठी हा दिवस साजरा केला जातो.यानिमित्ताने जगातील महिलांच्या भावभावना,वेदना,संवेदना, इच्छा-आकांक्षा यांची निदान एक दिवस का होईना चर्चा होते.त्या निमित्ताने महिलांच्या समस्या,अडचणी,प्रश्न उजागर होतात आणि त्या सोडवण्यासाठी काही उपाययोजना ठरवून त्यावर अंमलबजावणी करण्याचा निर्णय राजकीय,सामाजिक क्षेत्रातील धुरीणांकडून घेतला जातो.जगाची अर्धी लोकसंख्या महिलांची आहे.पुरुषांच्या बरोबरीने लोकसंख्या असतांना सुध्दा अजूनही महिलांना पुरुषांच्या बरोबरीने कोणत्याही देशामधे हक्क,अधिकार,सन्मान पूर्णपणे मिळालेला नाही.विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे शतक म्हणवून घेतल्या जाणाऱ्या एकविसाव्या शतकात महिलांच्या बाबतीत जर अशी निराशाजनक अवस्था असेल तर आम्ही खरोखर सुधारलेले,पुढारलेले आहोत काय हा प्रश्न निर्माण होतो.

जगातील प्रत्येक धर्माने पुरुषांच्या तुलनेत महिलांना कमजोर,हिन,अपात्र,अपवित्र,अबला ठरविणारे कायदे आणि नियम बनवले आहेत.हजारो वर्षापासूनचे हे महिला विरोधी धर्मनियम अजूनही अनेक देशात बऱ्याच मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे राबवितांना पुरुषप्रधान संस्कृतीच्या समर्थकांना अघोरी आनंद आणि अभिमान वाटत असतो.स्त्री ही पुरुषापेक्षा दुर्बल आहे, अबला आहे,हीन आहे अशा प्रकारचा प्रचार आणि प्रसार वेळोवेळी उच्चपदस्थ, उच्चवर्णीय वर्गाकडून केला जातो. त्याला आमच्या भगिनी सुद्धा मोठ्या प्रमाणात बळी पडतात ही सत्यता आहे.पुरुषांच्या तुलनेत स्वतःला कमी समजण्यात स्त्रीला सुद्धा धन्यता वाटते.पती परमेश्वर ही संकल्पना अभिमानाने डोक्यावर घेऊन नाचण्यात तिला गर्व वाटतो.त्यामुळे पुरुषप्रधान संस्कृतीच्या समर्थकांना आयतीच संधी प्राप्त होते आणि हा कट्टरतावादी वर्ग स्त्रियांना वेळोवेळी धर्माची,प्रथा परंपरांची,संस्काराची कारणे देऊन दाबून टाकण्यात यशस्वी होतो.

त्यामुळे आधुनिक काळात शिक्षणाच्या बाबतीत जरी महिलांनी लक्षणीय प्रगती केली असली तरीसुद्धा धर्म आणि संस्कृतीच्या क्षेत्रात महिलांना कुठेही पुरुषांच्या बरोबरीचा दर्जा नाही ही गोष्ट आपल्याला मान्य करावीच लागते.धर्म क्षेत्रामधे महिलांची लुडबूड नको किंवा धर्मामधे फक्त पुरुषांचेच वर्चस्व असू शकते अशा प्रकारचे धर्मग्रंथातील नियम पुन्हा पुन्हा मेंदुवर कोरुन स्त्रियांना गुलाम बनविण्याची प्रक्रिया जगात सर्वत्र अजूनही सुरू आहे.धर्म श्रेष्ठ की स्त्री या वादात धर्माला श्रेष्ठता प्रदान करण्यात येते.अजूनही स्त्रीला अपवित्र समजून अनेक धार्मिक स्थळी तिला बंदी आहे.गाईला पवित्र समजले जाते पण पाळी आलेल्या आईला मात्र अपवित्र मानले जाते.ही २१ व्या शतकातील फार मोठी शोकांतिका आहे.त्यामुळे जोपर्यंत धर्माच्या क्षेत्रात स्त्रियांना सन्मान मिळणार नाही, तोपर्यंत स्त्रियांचा दर्जा पुरुषांच्या बरोबरीने आला असे आपण म्हणूच शकत नाही. कमी शिकलेले अशिक्षित पुरुष पुजारी,मौलवी,पादरी बनू शकतात.मग उच्चविद्याविभूषित पात्रता असूनही महिलांना या ठिकाणी बंदी का ? हा प्रश्न आता स्वतः महिलांनीच उपस्थित करणे गरजेचे आहे.जोपर्यंत महिला धर्ममार्तडांना प्रश्न विचारणार नाही, तोपर्यंत त्यांना समान दर्जा मिळणे कठीण आहे.

सगळ्याच धर्माचे धर्ममार्तंड हे महिलांना गुलामीत ठेवण्याच्या वृत्तीचे आहेत.त्यामुळे धार्मिक क्षेत्रातील पुरुषांची मक्तेदारी जोपर्यंत मोडीत काढल्या जात नाही,तोपर्यंत स्त्रियांना मानसन्मान मिळणे अवघड आहे.जगातील बहुतांश धर्मग्रंथ स्त्रियांना दुय्यम दर्जा देतात.माणूस म्हणून जगण्याचा हक्क नाकारतात.धार्मिक क्षेत्रात हस्तक्षेप करण्याचे हक्क,अधिकार आणि स्वातंत्र्य हिरावून घेतात.घरातील आनंदाच्या क्षणी विधवा स्त्रीचे मुक्तपणे वावरणे अपशकुनी समजले जाते.संक्रांती सारख्या महिलांच्या उत्सवात विधवा स्त्रियांना दूर ठेवले जाते.घरातील निर्णय प्रक्रियेत तिला फारसे महत्व नसते.ती कमावती असली तरी नवऱ्याला विचारल्याशिवाय तिला पैसे खर्च करण्याचे अधिकार नसतात.मुलीपेक्षा घरात मुलाला जास्त प्राधान्य असते.या सर्वामागे धर्म आणि धर्माचे नियम आहेत हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

काही धर्मग्रंथात स्त्रियांना जनावरापेक्षाही हीन समजले जाते.जनावरे धार्मिक स्थळी प्रवेश करु शकतात; पण स्त्रियांना मात्र प्रवेश नाकारला जातो अशी विदारक परिस्थिती आहे.त्यामुळे जगातील अनेक सुधारकांनी आपआपल्या कालखंडात धर्मग्रंथातील भेदभावपूर्ण नियमांवर कठोर आसूड ओढले आहेत.त्यातील फोलपणा व विकृती लोकांच्या लक्षात आणून देण्यासाठी प्रचंड संघर्ष केला आहे.त्यामुळे त्यांना धर्ममार्तंडांच्या रोषाला सुध्दा बळी पडावे लागले असून अनेक धर्म सुधारकांना आपल्या प्राणाचे बलिदान द्यावे लागले आहे.हे फक्त भारतातच घडले असे नाही.परदेशातही बायबल मधील चुकीच्या व अवैज्ञानिक गृहीतकांवर टिका केल्यामुळे अनेकांना चर्चेसच्या रोषाला बळी पडावे लागले आणि प्राण गमवावे लागले.मुस्लिम धर्माच्या बाबतीतही तेच घडले आहे.म्हणून मुस्लिम धर्मात फारसे सुधारक निर्माण होत नाही.कारण मौलवींच्या फतव्यांमुळे त्या सुधारकाचे प्राण धोक्यात येतात.हिंदू धर्मातही अनेक धर्म सुधारकांचे बळी गेले आहेत व आजही दाभोळकर,पानसरे सारख्या सुधारकांच्या धर्माच्या तथाकथित ठेकेदारांकडून हत्या होत आहे.त्यामुळे कोणत्याही धर्माच्या ठेकेदारांना धर्मामधे सुधारणा आणि महिलां स्वातंत्र्य व अधिकारांच्या गोष्टी अजिबात आवडत नाही.त्यासाठी ते वेळोवेळी धर्माच्या नियमांचा हवाला देवून आपली अधिसत्ता कायम ठेवण्यासाठी जिवतोड प्रयत्न करीत असतात.त्याकरिता महिलांनी स्वतःच आधी धर्मग्रंथांचे वाचन करुन आपल्या बाबतीत काय लिहिले आहे ते समजून घ्यावे.एकदा त्यांनी ते समजून घेतले की, त्या स्वतःच अशा धर्मग्रंथ,धर्म पुरोहीत व धर्माच्या जाचक नियमांना नाकारुन मोकळ्या हवेत आनंदाने श्वास घ्यायला लागतील.समस्त महिलांना जागतीक महिला दिनाच्या हार्दिक सदिच्छा.

प्रेमकुमार बोके

अंजनगाव सुर्जी

८ मार्च २०२२ ( महिला दिन )

९५२७९१२७०६

Updated : 8 March 2022 4:35 AM GMT

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.