दुधडेअरी नजिकच्या सावरकर नगर परिसरातील नागरिकांची घरे हटवू नये – भाजपाची मागणी उपमहापौर राहूल पावडे यांच्या नेतृत्वात नागपूरात विभागीय रेल प्रबंधक खरे मॅडम यांची घेतली भेट योग्य तोडगा काढण्याचे डिआरएम खरे मॅडम यांचे आश्वासन


चंद्रपूर शहरातील दुधडेअरी परिसरातील सावरकर नगर भागात गेल्या २० वर्षापासून पक्की घरे बांधून राहणा-या नागरिकांनी रेल्वे विभागाने जागा खाली करण्याच्या नोटीस दिल्या आहेत. ही कारवाई त्वरीत थांबविण्यात यावी अशी मागणी चंद्रपूरचे उपमहापौर राहूल पावडे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने नागपूर येथे केली. माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांची याबाबत रेल्वेच्या वरिष्ठ अधिका-यांशी झालेल्या चर्चेनुसार राहूल पावडे यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने साऊथ रेल्वे नागपूरच्या विभागीय रेल प्रबंधक खरे मॅडम आणि वरिष्ठ विभागीय अभियंता श्री. प्रभात झॉ यांची भेट घेत त्यांचेशी चर्चा केली.
यावेळी नागपूरच्या विभागीय रेल प्रबंधक खरे मॅडम यांच्याशी चर्चा करताना उपमहापौर राहूल पावडे म्हणाले, महानगरपालिकेतर्फे या परिसरातील नागरिकांना मुलभूत सुविधा देण्यात आल्या आहेत. हे नागरिक महानगरपालिकेला मालमत्ता कराचा भरणा सुध्दा करीत आहे. या नागरिकांची घरे रेल्वे साईडींगपासून बरीच दूर आहेत. हे सर्व नागरिक कामगार व मोलमजूरी करणारे आहेत. त्यांची घरे हटविल्यास त्यांच्या निवासाचा गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे. ही अन्यायकारक कार्यवाही त्वरीत न थांबविल्यास भाजपातर्फे आंदोलन करण्याचा ईशारा राहूल पावडे यांनी यावेळी दिला. यासंदर्भात माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतीच रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेवून या विषयाकडे त्यांचे लक्ष वेधले असल्याचेही राहूल पावडे यावेळी म्हणाले.
ही कारवाई त्वरीत न थांबविल्यास जनक्षोभ उसळू शकतो. ही बाब लक्षात घेता मानवतावादी दृष्टीकोन ठेवून कारवाईला स्थगिती देण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. याबाबत वरिष्ठ अधिका-यांशी चर्चा करून योग्य तोडगा काढू असे आश्वासन नागपूरच्या विभागीय रेल प्रबंधक खरे मॅडम यांनी दिले. यावेळी राहूल पावडे यांच्यासह शिष्टमंडळात प्रमोद क्षिरसागर, प्रा. रवी जोगी, महेश गीते, बबन राऊत, सुशांत आक्केवार व अन्य नागरिकांची उपस्थिती होती.