"थ्री व्हीलर " मविआमध्ये अस्वस्थता !

"थ्री व्हीलर " मविआमध्ये अस्वस्थता !

————————————————

author,

श्री.तानाजी सखाराम कांबळे,

ममराठी डिजीटल टीम मुंबई.

www mmarathi.com

Updated On – 19:39 pm,

Sat, 2 April 22

————————————————

किमान समान कार्यक्रम या एका ब्रीद वाक्य खाली तयार झालेल्या महाविकासआघाडी मधील,राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी वगळता शिवसेना व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत नाराजी आता उघड होऊ लागली आहे.

पक्षांतर्गत गटबाजी,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेकडून मिळत नसलेला पुरेसा निधी,पक्षांतर्गत असणारे मंत्री यांचेकडून मिळत

नसलेल्या अपेक्षित सहकार्य,या विरोधात नाराजीचे

बंड पुकारणारे काँग्रेस पक्षाचे 25 आमदार,राष्ट्रवादीकडून विविध ठिकाणी शिवसेनेतील नेता यांची,निधीबाबत होणारी सातत्याने अडवणूक,आधी विविध कारणांचा,

महाराष्ट्रातील “थ्री व्हीलर महाराष्ट्र विकास आघाडी सरकार मधील अस्वस्थता” याचा आढावा घेणारा विशेष लेख!

महाविकास आघाडीत भाजपला आक्रमक प्रत्युत्तर देण्यावरून एकजूट नसल्याचे चित्र दिसून आले.

आधी शिवसेनेच्या २५ आमदारांचे निधीवाटपावरून नाराजीचे पत्र, नंतर खासदार गजानन कीर्तीकर व नुकतीच माजी मंत्री तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा महाविकास आघाडीमध्ये वरचष्मा

असल्याची टीका केल्याने महिनाभरात शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींमधील खदखद सातत्याने प्रकट झाली. तशात विरोधी पक्ष भाजप हा शिवसेनेचे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांच्या निकटवर्तीयांना केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून लक्ष्य करत असताना भाजपच्या नेत्यांविरोधातील तक्रारींवर आक्रमकपणे कारवाई होत नाही, राष्ट्रवादीकडे सहकार व गृह विभाग असूनही कारवाईचा वेग संथ राहतो असे अधिवेशनात बोलले जात होते. त्यामुळे महाविकास आघाडीत भाजपला आक्रमक प्रत्युत्तर देण्यावरून एकजूट नसल्याचे चित्र दिसून आले.

विधिमंडळ अधिवेशनाच्या सुरुवातीलाच आणि राज्याचा अर्थसंकल्प मांडण्यापूर्वीच शिवसेनेच्या २५ आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून विकासकामांमधील निधीवाटपात समान न्याय मिळत नसल्याची खंत व्यक्त केली होती. त्याची दखल घेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर या आमदारांची नाराजी दूर करण्याची जबाबदारी दिली. मुंबईत विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना शिवसेना खासदार गजानन कीर्तीकर यांनी रत्नागिरी दौऱ्यात दापोलीमध्ये रस्त्याच्या डांबरीकरण कामाच्या भूमिपूजन समारंभात विकास कामांच्या निधीची पळवापळवी केली जात असल्याचा आरोप करत ‘आम्ही म्हणायचे ठाकरे सरकार पण प्रत्यक्ष लाभ कोण घेतो, पवार सरकार…’ असे विधान करत स्थानिक शिवसेना नेत्यांच्या नाराजीला वाचा फोडली. त्यानंतर नाराजीचा सूर लावला तो माजी मंत्री तानाजी सावंत यांनी. आमच्यामुळे हे सत्तेत आले, आमच्या मांडीला मांडी लावून बसले आणि आमची घडी विस्कटायचा प्रयत्न करतात हे आम्ही खपवून घेणार नाही, अशा शब्दांत तानाजी सावंत यांनी सोलापुरातील मेळाव्यात राष्ट्रवादीवर टीका केली. शिवसेनेच्या विविध भागातील खासदार, आमदार, नेत्यांची ही नाराजी जाहीरपणे व्यक्त झाली. मुख्यमंत्रिपद आपल्या पक्षाकडे असूनही राष्ट्रवादी वरचढ ठरत असल्याची भावना यातून दिसून येते. त्याचबरोबर केवळ नेतृत्वाशी चांगले संबंध प्रस्थापित करून चालणार नाही तर शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींना आणि स्थानिक नेत्यांनाही विश्वासात घ्यावे लागेल, असा सूचक संदेश या माध्यमातून हे नेते देत आहेत. नाराजीनाट्याचे तीन अंक पार पडल्यावर व सावंत यांनी थोडी तिखट भाषा वापरल्यानंतर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी या नाराजीच्या जखमेवर फुंकर मारली. मीदेखील मुंबई उपनगराचा पालकमंत्री आहे. प्रत्येकजण कुठला तरी पालकमंत्री असतो. महाविकास आघाडीसारखा प्रयोग राजकीयदृष्ट्या आणि विकासासाठी यशस्वी ठरला आहे. काही ठिकाणी दोन्ही पक्ष एकमेकांविरोधात लढले, तेथे ही खदखद असते. ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेते एकत्र बसून नाराजी दूर करतात. राजकारणात थोडे पुढे-मागे हे चालत राहते. पण आम्ही महाराष्ट्रासाठी एकत्र आलो असून पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहोत हे महत्त्वाचे आहे,’ अशी भूमिका आदित्य ठाकरे यांनी मांडली.

महाविकास आघाडीमध्येही (Mahavikas Aghadi) सर्वकाही आलबेल आहे,असे दिसून येत नाही.विशेषतः शिवसेना (shivsena) आणि काँग्रेसकडून (congress) राष्ट्रवादीच्या (ncp) वर्चस्ववादी धोरणाबाबत नाराजीचा सूर दिसून येत आहे. काँग्रेसचे नेते बैठकांच्या पातळीवर नाराजी व्यक्त करत असले तरी आक्रमक शिवसेना नेते मात्र थेट राष्ट्रवादीला अंगावर घेत आहेत. त्याची सुरुवात परभणीचे खासदार संजय जाधव (Sanjay Jadhav) यांनी केली.त्यानंतर माजी खासदार अनंत गीते (Anant Geete), खासदार गजानान किर्तीकर (Gajanan Kirtikar) (ता. २८ मार्च) माजी मंत्री तानाजी सावंतांनीही (Tanaji Sawant) राष्ट्रवादीला खडे बोल सुनावले.शिवसेनेच्या तब्बल २५ आमदारांनी अधिवेशनावर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला होता.

भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येत महाविकास आघाडीच्या माध्यमातून सत्ता स्थापन केली. एकमेकांविरोधात लढलेल्या या पक्षांमध्ये सत्तास्थापनेनंतर काही दिवसांतच खटके उडायला सुरुवात झाली. पारनेरचे शिवसेनेचे नगरसेवक फोडून त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश दिल्याबद्दल खुद्द मुख्यमंत्र्यांनी नाराजी दर्शविली होती.

त्या प्रकरणात मिलिंद नार्वेकर यांनी यशस्वी मध्यस्थी करत ते नगरसेवक पुन्हा शिवसेनेत आणले होते.पोलिसांच्या नियुक्त्यांवरून ही नाराजीची चर्चा रंगली होती.महाराष्ट्रात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्त्वात महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या पाठिंब्यावर उद्धव ठाकरे यांचं सरकार आलं. शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आघाडीचं सरकार राज्यात असून गेल्या काही दिवसांमध्ये शिवसेनेच्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेससंदर्भातील (NCP) नाराजी दर्शवणारी वक्तव्य केली आहेत. उस्मानाबाद येथील आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत, गजानन किर्तीकर, श्रीरंग बारणे यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर टीका केलीय.तर,शिवसेनेचे परभणीचे खासदार संजय जाधव यांनी गेल्या वर्षी राष्ट्रवादीला पायाखाली घालू, असं म्हटलं होतं. तर, रायगडमधील माजी खासदार शिवसेना नेते अनंत गीते यांनी महाविकास आघाडी सरकार ही तडजोड असल्याचं म्हटलं होत. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खूपसून झाल्याचं ते म्हणाले होते.गृह विभागाच्या धोरणावरुन शिवसेनेनं राष्ट्रवादी काँग्रेस बद्दल नाराजी दर्शवल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.

तानाजी सावंत काय म्हणाले?

आम्हाला सत्तेत बसायची सवयच नव्हती. शिवसेना हा विस्थापितांचा गट आहे, कुणाही आजमावून बघू नये. शिवसेनेला दुय्यम वागणूक मिळते.अर्थसंकल्पातही तेच दिसून आलं. 60 ते 65 टक्के बजेट राष्ट्रवादीला, 30 ते 35 टक्के काँग्रेसला, त्यातही 16 ठक्के पगारासाठी काढावे लागतात. विकासकामाला केवळ 10 टक्के मिळतात. राष्ट्रवादीचा ग्रामपंचायत सदस्यही कोटी रुपये आणतो आणि आमच्या छातीवर नाचतो. आम्हाला केवळ गोड बोललं जातं. आम्ही केवळ आदेशाची वाट पाहतोय. जोपर्यंत सहन होईल तोवर सहन करु. आमची राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर प्रचंड नाराजी आहे, अशा शब्दात तानाजी सावंत यांनी जाहीरपणे आपली भूमिका मांडली होती.

गजानन किर्तीकर काय म्हणाले?

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील शिर्दे येथे ब्राम्हणवाडी ते कोळबांद्रे रस्त्याच्या डांबरीकरण कामाच्या भूमिपूजन समारंभाला खासदार गजानन किर्तीकर उपस्थित होते. एका आमदाराला त्याच्या मतदार संघात विकास कामासाठी शासनाकडून निधी मिळविण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागतात, असं किर्तीकर म्हणाले होते. विकास कामांच्या निधीमध्ये पळवापळ केली जात असून ग्रामविकास मंत्रालयाच्या 25 /15 योजनेमधून निधी मिळविण्यासाठी मोठी स्पर्धा पाहावयास मिळते. आम्हाला मुंबईमध्ये हा प्रश्न उद्भवत नाही, मुंबईमध्ये नागरोत्थान, नगरविकासचा निधी मिळतो, मुख्यमंत्र्यांच्या मागे लागून आम्ही निधी मिळवितो. मात्र, निधीची पळवापळवी केली जात असून ” आम्ही म्हणायचे ठाकरे सरकार पण प्रत्यक्ष लाभ कोण घेतो, पवार सरकार” असे म्हणत त्यांनी निधी वाटपात शिवसेनेवर अन्याय होत असल्याने नाराजी व्यक्त केली होती.

संजय जाधव काय म्हणाले?

गेल्या वर्षी शिवसेनेचे परभणीचे खासदार राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात आक्रमक झाले होते. “आमच्याही भावना अनावर होतात हे लक्षात ठेवा. शेवटी काही मर्यादा असतात. कुठपर्यंत शांत बसायचं, कुठ पर्यंत सहन करायचं. जेव्हा माकडीण सुद्धा स्वत:ला बुडायची वेळ आल्यावर लेकराला पाया खाली घालते हे लक्षात ठेवा. तर राष्ट्रवादीला आम्ही केव्हाही पायाखाली घालू शकतो हे तुम्हाला सांगतो. शेवटी आम्ही आता सहनशीलतेच्या पलिकडे गेलो आहोत, असं संजय जाधव म्हणाले होते.

राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत

खंजीर खुपूसन: अनंत गीते

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आमचे नेते होऊ शकत नाहीत. महाविकास आघाडी ही केवळ तडजोड आहे. राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे, असा हल्लाबोल शिवसेना नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी रायगडमध्ये केले होते.

राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्र्यांच्या स्वभावाचा गैरफायदा घेतेय: श्रीरंग बारणे

राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला डिवचण्याचा मुद्दाम प्रयत्न करत आहे. महाविकास आघाडीत राष्ट्रवादीकडून शिवसेनेसोबत दूजाभाव केला जातोय. निधी वाटपातही दूजाभाव होतोय. मावळ लोकसभेची जागा सोडण्याची मागणी केली की ती करायला लावली हे शोधलं पाहिजे. ज्यांनी ही मागणी केली ते कोण आहेत, त्यांना मी ओळखत नाही. सध्या राज्यातील सत्तेचा सर्वाधिक लाभ राष्ट्रवादी काँग्रेसच घेतेय. राष्ट्रवादी काँग्रेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या स्वभावाचा गैरफायदा घेत आहे, असा गंभीर आरोप बारणे यांनी केला होता.

राष्ट्रवादीवरच नाराजी का?

वरकरणी शिवसेनेतील नाराजांचा रोख पूर्णपणे राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे असल्याचे दिसत असले तरी त्यात राज्य सरकारच्या खात्यांशी निगडित वादाची किनार अधिक आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे अर्थ विभाग असल्याने निधीवाटपात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका निर्णायक ठरते. तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांसह विविध विकास कामांचा विचार करता ग्रामविकास विभागाची भूमिका ही महत्त्वाची असते. तो विभागही राष्ट्रवादीकडेच आहे. त्यामुळे नाराजीचा राेख आपसूकच राष्ट्रवादीकडे जातो. ही खाती जर दुसऱ्या पक्षाकडे असती तर त्या पक्षाकडे इतरांचा नाराजी रोख असता. अर्थात याला राजकीय पदरही आहे. शिवसेना-राष्ट्रवादी हे कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडासारख्या भागांत एकमेकांचे प्रमुख स्पर्धक होते. सव्वादोन वर्षांपूर्वी अचानक महाविकास आघाडी झाल्याने स्थानिक पातळीवरील कुरबूर आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर डोके वर काढताना दिसते.

राष्ट्रवादीकडील आणखी दोन महत्त्वाचे विभाग म्हणजे सहकार व गृह.या विभागांबाबतची नाराजी मात्र राजकीय स्वरूपाची अधिक आहे.

ठाकरे कुटुंबाचे नातेवाईकांवरही केंद्रीय यंत्रणा कारवाई करत असताना मुंबई बँक प्रकरणात भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यातील विलंब, सहकार विभागही कठोर कारवाई करत नाही अशी शिवसेनेची भावना आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेतील भाषणात शिवसेनेवर आणि सरकारवर टीका करताना उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे कौतुक केल्याची बाब शिवसेनेच्या नजरेतून सुटलेली नाही. त्यानंतरच नाराजीचा सूर वाढला. फडणवीस यांना जबाब नोंदवण्यासाठी आधी पोलीस ठाण्यात बोलावले गेले. पण नंतर त्यांच्या घरी जाऊन जबाब घेतला गेला यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सूचक नाराजी व्यक्त केली होती. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मात्र रोजच्या राजकीय आरोप-प्रत्यारोपात व केंद्र-राज्य संघर्षात गुंतण्यापेक्षा विकासकामांवर भर देऊन जनमत आपल्याकडे वळवावे अशी भूमिका घेतली आहे. त्याचबरोबर भाजप नेत्यांविरोधात कारवाईच्या बाबतीत राजकीय हस्तक्षेप दिसू नये, कायदा, पोलीस-प्रशासनाला त्यांचे काम त्यांच्या पद्धतीने करू द्यावे, असे त्यांचे म्हणणे आहे. फडणवीस यांनी अजित पवार आणि वळसे-पाटील यांचे कौतुक केल्यानंतर शिवसेनेने भाजप नेत्यांवरील कारवाईबाबत सौम्य भूमिकेचा मुद्दा राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या कानावर घातल्याचे व त्याची दखल घेत पवार यांनी सोमवारी गृहमंत्री वळसे-पाटील यांच्याशी चर्चा केल्याच्या ब्रेकिंग न्यूजही झळकल्या. पण नंतर ती बैठक आयपीएलबाबत असल्याचे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले.

महाविकास आघाडीतील या धुसफुशीचा परिणाम काय?

महाविकास आघाडीतील या धुसफुशीमुळे लगेचच राज्य सरकारवर काहीही परिणाम होण्याची शक्यता नाही.

खुद्द आदित्य ठाकरे यांनीच शिवसेनेच्या नाराजांना समजावण्याचे सूतोवाच केले. शिवाय यापूर्वीही कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे १५ वर्षांचे आघाडी सरकार आणि भाजप-शिवसेनेचे ५ वर्षांचे युती सरकार या दोन्हींत काही कुरबुरी सुरूच असायच्या. पण त्यामुळे सरकार अडचणीत आले असे आजवर तरी झालेले नाही.

मात्र विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांमधील कुरबुरीचे राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न करतो. तसा तो आता भाजपचे नेते करत आहेत. २०२२ हे वर्ष राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे आहे. २५ जिल्हा परिषदा, मुंबई, ठाणे, पुणेसह २२ महानगरपालिका व २१७ नगरपरिषदांच्या निवडणुका यावर्षी होणार आहेत. या निवडणुकांमध्ये यश मिळवण्याचे महाविकास आघाडीचे लक्ष्य आहे. देशातील विधानसभा निवडणुकांतील यशामुळे आत्मविश्वास वाढलेल्या भाजपला रोखायचे तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही अधिकाधिक ठिकाणी आघाडी करण्याचा नेत्यांचा प्रयत्न आहे. स्थानिक पातळीवर वाढत चाललेल्या कुरबुरी या उद्दिष्टात अडथळा ठरणार नाहीत हे पाहून आपापले पक्ष एकसंध ठेवणे, काहीप्रमाणात मंत्रिमंडळात असलेल्या कुरबुरींवर तोडगा काढून महाविकास आघाडीत एकजुटीचा संदेश देण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.

महाराष्ट्र काँग्रेसच्या आमदारांनी पक्षाच्या मंत्र्यांबद्दल तक्रार केली आहे. आमच्या समस्या, तक्रारींकडे दुर्लक्ष केले जात आहे, असं त्यांचं म्हणणं आहे.या आमदारांनी सोनिया गांधींना थेट पत्र लिहिलं असून,यामध्ये तुम्हीच हस्तक्षेप करावा, असा आग्रह धरल्याचे कळते. महाविकास आघाडीमधील मंत्री विशेषतः काँग्रेस पक्षाचे मंत्री त्यांच्या समस्यांकडे कानाडोळा करत असल्याचा उल्लेख त्यांनी पत्रात केला आहे.मतदारसंघात विकासकामे करायची आहेत, पण त्याच्या अंमलबजावणीसाठी केलेल्या विनंतीकडे मंत्री दुर्लक्ष करत असल्याने त्याचा परिणाम आगामी निवडणुकांमध्ये दिसून येईल,असे संबंधित आमदारांचे म्हणणे आहे. स्वाभाविकच पक्षाच्या कामगिरीवरही त्याचा परिणाम होणार आहे. पक्षाकडूनच आपले आमदार आणि नेत्यांच्या समस्या, तक्रारींकडे दुर्लक्ष झाले तर, निवडणुकांमध्ये पक्षाची कामगिरी चांगली कशी होईल, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

काँग्रेसचे भोरचे आमदार संग्राम थोपटे,जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांची नाराजी उघड.

काँग्रेसचे भोरचे आमदार संग्राम थोपटे,यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून भेटीसाठी वेळ मागितली आहे.भेटीसाठी माझ्यासोबत 20 ते 25 आमदार असतील असंही संग्राम थोपटे म्हणाले आहेत.

“काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात लेखी तक्रार करणार,” असा इशारा काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिला आहे.

तसंच काँग्रेसच्या 25 आमदारांनी अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या भेटीची वेळ मागितली आहे. यासंदर्भात काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहिलं आहे.

ठाकरे सरकारमध्ये कोंडी होत असल्याचं सांगत यापूर्वीही काँग्रेसने अनेकदा नाराजी व्यक्त केली आहे. ‘सरकार आमच्यामुळे आहे, आम्ही सरकारमुळे नाही’ असंही वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं होतं.

काँग्रेस नेत्यांच्या या पत्रामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ठाकरे सरकाचे दोन मंत्री तुरुंगात असताना आणि अनेक नेते ईडीच्या रडारवर असताना आधीच संकटात अडकलेल्या सरकारमध्ये आता अंतर्गत कलह आणखी तीव्र झालाय का? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पत्रात नेमकं काय म्हटलंय?

काँग्रेसचे भोरचे आमदार संग्राम थोपटे यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून भेटीसाठी वेळ मागितली आहे.भेटीसाठी माझ्यासोबत 20 ते 25 आमदार असतील असंही संग्राम थोपटे म्हणाले आहेत.

या पत्रावर काँग्रेसच्या इतरही 25 आमदारांच्या सह्या आहेत.3 किंवा 4 एप्रिलला सोनिया गांधी यांनी भेटीसाठी वेळ द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

या दिवशी शक्य नसल्यास तुम्ही वेळ असेल तेव्हा भेट द्यावी असंही त्यांनी म्हटलं आहे.या दरम्यानच्या काळात काँग्रेसचे आमदारांचं दिल्लीत प्रशिक्षणही आहे.

महत्त्वाचं म्हणजे राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी वेळ हवी असल्याचं त्यांनी पत्रात म्हटलंय.

‘बाळासाहेब थोरातांची लेखी तक्रार करणार’

जालन्याचे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांवर टीका करत ‘घरचा आहेर’ दिला आहे.काँग्रेसचे मंत्रीच काँग्रेसच्या आमदारांना मदत करत नाहीत. तसंच काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांवर विश्वास नाही असंही ते म्हणाले आहेत.

शिवाय,बाळासाहेब थोरात यांची लेखी तक्रार करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

यापूर्वीही कैलास गोरंट्याल यांनी नाराजीबाबात उघड भूमिका घेतली होती. ऑगस्ट 2020 मध्येही कैलास गोरंट्याल यांनी निधी मिळत नसल्याने नाराजी व्यक्त केली होती. 11 आमदारांसह उपोषणाला बसण्याचा इशाराही त्यांनी दिला होता.

एकनाथ शिंदे मंत्री असलेल्या नगरविकास खात्याकडून जाणीवपूर्वक निधी दिला जात नसल्याचा आरोप करत शिवसेनेवर निशाणा साधला होता.

कैलास गोरंट्याल हे जालना जिल्ह्यातून काँग्रेसचे आमदार आहेत. जालना मतदारसंघातून ते तीन वेळा काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेत.त्यांच्या पत्नी संगीता गोरंट्याल जालना नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष आहेत.2019 विधानसभा निवडणुकीत कैलास गोरंट्याल यांनी शिवसेनेच्या अर्जुन खोतकर यांचा पराभव केला. या मतदारसंघात काँग्रेसचे गोरंट्याल आणि शिवसेनेचे खोतकर यांच्यात कायम अटीतटीची लढत पहायला मिळते.

काँग्रेस आमदारांच्या नाराजीची कारणं काय?

महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेपासून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांचं सरकार कोसळणार अशी भाकितं भाजपकडून वर्तवली जात आहेत.शिवाय, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांनीही निधी वाटपात भेदभाव होत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती.

आता काँग्रेसच्या 20 आमदारांनी थेट सोनिया गांधींना यासंदर्भात चर्चा करण्यासाठी भेटीची वेळ मागितली आहे. काँग्रेसमध्ये अंतर्गत या चार मुद्यावरून नाराजी असल्याचं दिसून येत आहेत.

निधी वाटपावरून नाराजी.

काँग्रेस नेते ठाकरे सरकारमध्ये भूमिका घेत नाहीत

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक लांबणीवर

काँग्रेसमध्ये अंतर्गत खदखद असल्याचे पक्षातील

ज्येष्ठ सांगतात, “काँग्रेसमध्ये मंत्री झालेले नेते आहेत ते आणि ज्यांना सत्तेचा काहीही लाभ मिळालेला नाही अशांचा संघर्ष कायम सुरू असतो. यात काहीही नवीन नाही. सोनिया गांधींपर्यंत ते या गोष्टी घेऊन जातील. पण तरीही केंद्रात काँग्रेसला आशेचा किरण दिसत नाही तोपर्यंत काँग्रेसला सत्तेसाठी आणि भाजपचा सामना करण्यासाठी नमतं घ्यावं लागेल असं वाटतं.”

कुठल्याही पक्षामध्ये दोन घटक असतात. सत्तेचा लाभ झालेले संतुष्ट आणि सत्तेचा लाभ न झालेले असंतुष्ट यांच्यात संघर्ष सुरू असतो आणि पक्षांतर्गत खदखद दिसून येते.”अशा बातम्यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीचा लाभ काँग्रेसला मिळावा यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जाईल. पण नेते, आमदार, मंत्र्यांनी कितीही प्रस्ताव दिला तरी अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांचा असतो. त्यामुळे या राजकारणात काँग्रेसची कोंडी होताना दिसत आहे.” असंही ते म्हणाले.

महाविकास आघाडी सरकारला आता जवळपास अडीच वर्षे झाली. त्यामुळे आता सरकारमधील पक्षांतर्गत नाराजी बाहेर येऊ लागली आहे. यापूर्वीही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडीची 15 वर्षे सत्ता होती तेव्हाही अनेक मुद्यावरून दोन्ही पक्षात कायम पदांसाठी, निधीसाठी रस्सीखेच सुरू असायची. यूतीच्या काळातही शिवसेना, भाजपमध्ये टोकाचा संघर्ष दिसून आला होता.

काँग्रेसचं अंतर्गत राजकारण

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये सध्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांमध्येही त्यामुळे अस्वस्थता असल्याचं दिसून येत आहे.

एकाबाजूला विधानसभा अध्यक्ष पदावरून काँग्रेसमध्ये अंतर्गत स्पर्धा आहे तर दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मंत्रिपद हवं असल्याने राजकारण सुरू असल्याचंही काँग्रेसचे नेते खासगीत सांगतात.

शिवाय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस महाविकास आघाडीसोबत लढवणार की स्वतंत्र लढवणार यावरूनही मतभेद असल्याचे समजते.

मुंबईसारख्या शहरात काँग्रेसने स्वतंत्र निवडणूक लढल्यास पक्षाला मोठा फटका बसू शकतो असंही जाणकार सांगतात. राज्यात सत्तेत एकत्र असताना मुंबईत स्वतंत्र लढल्याने मतांचं मोठ्या प्रमाणात

विभाजन होण्याची शक्यता असल्याने काँग्रेसला

नुकसान होऊ शकतं असं राजकीय

विश्लेषकांचं म्हणणं आहे.”काँग्रेसमध्ये नाना पटोले विरुद्ध ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यातला संघर्ष आता उघड आहे.त्यामुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह सुरू असल्याचं स्पष्ट होतं.

निधी वाटपात शिवसेनेला दुय्यम स्थान दिलं अशी टीका शिवसेनेच्याही काही नेत्यांनी केली. त्याचप्रमाणे आता काँग्रेसचे आमदारही आक्रमक झाले आहेत.”

“ठाकरे सरकारमध्ये काँग्रेसला डावललं जातं असं भाजपकडूनही वारंवार काँग्रेसला डिवचलं जातं. तसंच काँग्रेसमध्ये राष्ट्रीय पातळीवरही अजूनही गोंधळाची परिस्थिती आहे. त्याचाही फटका पक्षाला बसत आहे,”

UPA अध्यक्षपदाच्या वक्तव्यावरून काँग्रेस आणि शिवसेनेत जुंपली

केंद्रात भाजप सरकारला आव्हान देण्यासाठी विविध विरोधी पक्षांची आघाडी स्थापन करण्याच्या घडामोडींना गेल्या काही काळापासून वेग आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी UPA चे नेतृत्त्व करावं अशी भूमिका मांडली जात असेल तर आम्ही त्याचं स्वागत करू. देशपातळीवर विरोधी पक्षांना एकजूट करायचं असल्यास हे काम शरद पवार करू शकतात असंही ते म्हणाले.

दिल्लीत पार पडलेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यक्रमात शरद पवार यांच्या उपस्थितीत संयुक्त पुरोगामी आघाडी म्हणजे यूपीए अध्यक्षपदाची धुरा शरद पवार यांच्याकडे सोपवायला हवी असा ठराव मंजूर करण्यात आला होता.

काँग्रेसने संजय राऊत यांच्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिलं आहे. यूपीएचे सदस्य नसणाऱ्यांनी यूपीएबाबत बोलू नये असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे.

संजय राऊत यांनी केलेलं वक्तव्य हे त्यांचं व्यक्तिगत मत असू शकतं. शिवसेना अद्याप यूपीएमध्ये सामील नाही. त्यांनी आधी यूपीएमध्ये सामील व्हावं असंही त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

Updated : 2 April 2022 2:43 PM GMT

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.