तिसऱ्या लाटेचा सामना एकजुटीने करूया : महापौर राखी संजय कंचर्लावार

निलेश तराड़े
सिंदवाही तालुका प्रतिनिधि
चंद्रपूर शहर महानगरपालिकेत प्रजासत्ताक दिन सोहळा
चंद्रपूर | मागील दोन वर्षापासून आपण कोरोनारूपी शत्रूसंगे युद्ध लढतो आहोत. हे युद्ध लढताना चंद्रपूर शहराच्या मूलभूत सुविधाकडे दुर्लक्ष होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. आपण सर्वानी स्वतःच्या आणि समाजाच्या रक्षणासाठी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा एकजुटीने सामना करूया, असे प्रतिपादन महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी केले.
महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त बुधवार, २६ जानेवारी रोजी महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी त्या बोलत होत्या. दरम्यान, महानगरपालिका कार्यालयासमोरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती संदीप आवारी, आयुक्त विपीन पालीवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी महापौर म्हणाल्या, कोरोनाची महामारी अद्याप संपलेली नाही. नवे वर्ष उजाडताच तिसरी लाट सुरु झाली. शहरातील १०० टक्के नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात आले. लसीकरण आपल्या दारी, लस घ्या आणि खरेदीत सवलत मिळवा, धार्मिक प्रार्थनास्थळी लसीकरण मोहीम, लस नाही तर ऑटोत प्रवेश नाही, दुकानांवर लाल स्टिकर मोहीम, इतकेच नव्हे तर बम्पर लकी ड्रॉ आदी विविध योजना राबविण्यात आल्या. या माध्यमातून लसीकरणाची टक्केवारी वाढविण्यात मदत झाली. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी आज सर्वानी लसीकरण करण्याची गरज आहे. चंद्रपूर शहराच्या विकासासाठी योगदान देत असलेल्या चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे सर्व पदाधिकारी, सर्व अधिकारी, नगरसेवक आणि कर्मचाऱ्यांचे त्यांनी आभार मानले.
या सोहळ्यानंतर महापौर आणि पदाधिकाऱ्यांनी मेन रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, जटपुरा गेट येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन केले.
दरम्यान, प्रभाग कार्यालय क्रमांक 1 संजय गांधी मार्केट सिव्हिल लाइन्स, प्रभाग कार्यालय क्रमांक दोन कस्तुरबा भवन सात मजली इमारत गांधी चौक, प्रभाग कार्यालय क्रमांक तीन देशबंधू चित्तरंजन दास प्राथमिक शाळा बंगाली कॅम्प, हुतात्मा स्मारक वाचनालय सिविल लाइन्स येथे ध्वजारोहण व मानवंदना कार्यक्रम पार पडला.