ढगाळ वातावरणामुळे 'व्हायरल फिवर'

महागांव – गेल्या काही दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामूळे तालुक्याच्या ग्रामीण भागात साथरोगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयाबरोबर खासगी रुग्णालयांत येणाऱ्या साथरोगाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. यावर्षी पावसाने आपला मुक्काम लांबविल्याने साथ रोगांचे प्रमाण सर्वाधिक वाढले आहे. दिवसभर ढगाळ वातावरण आणि रात्री काही वेळ पावसाच्या सरी नंतर पावसाची उघडझाप असल्याने शहरास ग्रामीण भागात साथरोग पसरु लागले आहे. सर्दी, ताप, खोकला, डोकेदुखी, मलेरिया, टायफाईड अशा विविध रोगांच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून शासकीय रुग्णालयाबरोबरच खासगी रुग्णालये फुल्ल दिसत आहेत. काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव होत आहे. याकरिता नागरिकांनी देखील पुढाकार घेवून आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. सध्या जास्त पाण्यामुळे जागोजागी पाणी साचत असून या डबक्यांमुळे डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. यामुळे रोगराई पसरत आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी साचणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे.
पॅथॉलॉजी सेंटरवर एकच गर्दी
आजाराचे योग्य निदान व्हावे यासाठी डॉक्टरांकडून रक्त, लघवी तपासणीसाठी टेस्ट करुन घेण्याचा सल्ला देण्यात येतो. त्यामुळे पॅथॉलॉजी सेंटरवर रुग्णांना पाठविण्यात येते. परिणामी, शहरातील पॅथॉलॉजी सेंटरवर रुग्णांची एकची गर्दी दिसून येत आहे.
सर्दी, ताप, खोकला,डोकेदुखी, अंगदुखी यासह टायफाइडच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली आहे. नागरिकांनी परिसरात स्वच्छता ठेवावी, डबके साचू देऊ नये, बाहेरचे खाणे टाळावे. रुग्णांनी आवश्यकतेनुसार उपचारासाठी सरकारी दवाखाण्याचा वापर करावा. उपचारासाठी सरकारी यंञणा सज्ज आहे.
– रजतकुमार खाडे, सदस्य, रुग्णकल्याण समिती प्राथमिक आरोग्य केंद्र, महागांव.