डाॅ. शैलजा रानडे यांना यवतमाळकरांची श्रद्धांजली : सुसंस्कृत पिढी घडविणारे व्यक्तित्त्व लोपले

यवतमाळ, डाॅ. सौ. शैलजा मधुकर रानडे यांची विद्वत्ता, वक्तृत्व, साहित्य आणि अध्यात्म यातील उंची यवतमाळकरांना कायम अचंबित करीत आली. त्यांच्या भेटीतही शांत, संयत, प्रसन्न व्यक्तित्त्व आपलं, जिव्हाळ्याचं वाटत आलं. संस्कृत हा त्यांचा प्राणस्वर होता. कुठलाही भेद न ठेवता सातत्याने ज्ञानदान करीत सुसंस्कृत पिढी घडविणारे व्यक्तित्त्व आज लोपल्याची भावना येथे व्यक्त करण्यात आली.
स्थानिक बाबाजी दाते कला व वाणिज्य महाविद्यालयातील स्वा. सावरकर सभागृहात आयोजित सभेत यवतमाळकरांनी डाॅ. शैलजा रानडे यांना प्रातिनिधिक श्रद्धांजली अर्पण केली.
ज्येष्ठ निरुपणकार उमेश वैद्य यांच्या अध्यक्षतेत सोमवारी, २४ जानेवारी रोजी झालेल्या या सभेच्या मंचावर रा. स्व. संघाचे जिल्हा संघचालक प्रदीप वडनेरकर, रा. से. समितीच्या प्रांत कार्यवाहिका रोहिणी आठवले, संस्कृत भारतीचे प्रांत उपाध्यक्ष श्रीनिवास वर्णेकर प्रामुख्याने उपस्थित होते.
यवतमाळचे आमदार मदन येरावार यांनी यावेळी बोलताना, विवेकानंद विद्यालयात शैलाताईंच्या सहज सोप्या शैलीतून संस्कृत शिकायला मिळाल्याची आठवण सांगितली. संस्कार भारतीचे पश्चिम क्षेत्र प्रमुख चंद्रकांत घरोटे यांनी ते यवतमाळात प्रचारक असतानाच्या काळातील मातृहृदयी शैलाताई उलगडल्या. डाॅ. रमाकांत कोलते यांनी बालाजी मंदिरातील प्रवचनमालांमध्ये त्या उत्तम श्रोत्या आणि परस्पर आदर करणाऱ्या कशा जाणवलेल्या ते सांगितले.
श्रीनिवास वर्णेकर यांनी शैलाताई संस्कृत भारतीच्या प्राण होत्या असे सांगून संस्कृतचा प्रसार हीच त्यांना श्रद्धांजली ठरेल असे म्हटले. समितीच्या रोहिणीताई आठवले यांनी राष्ट्र सेविका समितीच्या मार्गदर्शक हरविल्याची भावना व्यक्त केली. जिल्हा संघचालक प्रदीप वडनेरकर यांनी, शैलाताईंनी संघ संस्काराचं घर अशी ओळख निर्माण केल्याचे गौरवोद्गार काढले. दाते महाविद्यालयातील शिक्षकांचा आदर्श असावा असा अत्यंत विद्वान सहकारी आपल्याला त्यांच्यात दिसल्याचे प्रा. विवेक देशमुख म्हणाले. वर्षा दामले यांनी शैलाताई अध्यात्म जगल्या असे सांगितले तर बळवंत चिंतावार यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी त्या कायम प्रेरणास्रोत राहिल्याचे म्हटले.
अध्यक्षीय भाषणात उमेश वैद्य यांनी विवेकानंद विद्यालयापासून शहरातील धार्मिक कार्यक्रम व उपासनांमध्ये सक्रिय राहून चैतन्य निर्माण करणाऱ्या शैलाताईंच्या आठवणी सांगितल्या. उत्तरा रानडे गोगटे हिने आईचे संस्कार म्हणजे काय असतं ते प्रत्यक्षात अनुभवायला मिळल्याचं आपल्या भावपूर्ण मनोगतात स्पष्ट केलं.
सभेचे संचालन मोरेश्वर पुंडशास्त्री यांनी केले. प्रारंभी शुभलक्ष्मी कुळकर्णी हिने ‘माझ्या देहाची पालखी’ हा भावपूर्ण अभंग सादर केला. यावेळेस उपस्थित विविध शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, आध्यात्मिक, राजकीय, आर्थिक संस्था संघटनांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात प्रत्येकाने व्यासपीठावर ठेवलेल्या डाॅ. रानडे यांच्या प्रतिमेस पुष्पार्चन केले. सामूहिक शांतिपाठानंतर ‘कल्याणकरी रामराया’ या प्रार्थनेने सभेची सांगता झाली.
—–
छायाचित्र : डाॅ. शैलजा रानडे यांच्या श्रद्धांजली सभेत बोलताना उमेश वैद्य. मंचावर रा. से. समितीच्या रोहिणी आठवले, संस्कृत भारतीचे श्रीनिवास वर्णेकर, जिल्हा संघचालक प्रदीप वडनेरकर