जंजिरे धारावी कोट विजयदिनाची परंपरा कायम

जंजिरे धारावी कोट विजयदिनाची परंपरा कायम

वैभव पाटील :पालघर प्रतिनिधी

२८४ वे वर्षे विक्रमी प्रतिसादात साजरे

किल्ले वसई मोहिम परिवार, महाराष्ट्र व युवा शक्ती प्रतिष्ठान, पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने भाईंदर उत्तन चौक मधील ऐतिहासिक जंजिरे धारावी कोट २८४ वा विजयदिन दिनांक ६ मार्च २०२२ रविवार फाल्गुन शु ४ विनायक चतुर्थी रोजी साजरा करण्यात आला. गेली तब्बल १९ वर्ष उत्तर कोकणातील गडकोटांची विजय दिन परंपरा व मानवंदना साजरी करण्यात किल्ले वसई मोहिम परिवाराचे अमूल्य योगदान आहे. आजच्या मोहिमेत एकूण ५७ दुर्गमित्रांनी सक्रिय सहभाग नोंदवला. सकाळी ८ ते दुपारी १ या वेळेत जंजिरे धारावी वास्तू पूजन, गडदेवता मानवंदना, भगवे ध्वज मानवंदना, नरवीरांच्या ज्ञात अज्ञात स्मृतींना मानवंदना, दर्या बुरुज व समुद्र पूजन, सविस्तर इतिहास मार्गदर्शन इत्यादी उपक्रम पूर्ण केले. आजच्या विजयदिनाचे मुख्य उद्दिष्ट “जंजिरे धारावी कोट इतिहास मार्गदर्शन” हे जाहीर करण्यात आले होते. आजच्या इतिहास मार्गदर्शन सत्रात दुर्गमित्रांनी ऐतिहासिक धारावी चर्च ते जंजिरे धारावी कोट परिसराची पायी इतिहास सफर पूर्ण केली. यात मुख्यत्वे धारावी चर्च, युद्धभूमी स्थळ, गायमुख टाके, श्री दत्त स्थान, मोर्चा ठिकाण, श्री आदिशक्ती धारावी देवी मंदिर, धारावी शिळा डोंगरी, जंजिरे धारावी दर्या बुरुज या स्थळी प्रत्यक्ष भेट देऊन इतिहास समजून घेतला. आजच्या इतिहास मार्गदर्शन सफरीत इतिहास अभ्यासक श्रीदत्त नंदकुमार राऊत यांनी धारावी किल्ल्याच्या इतिहास संदर्भ पुराव्यांची मांडणी केली. राई गावचे कलाप्रेमी हेमेन्द्र भोईर यांनी श्रीदत्त राऊत सरांना स्वतः तयारी केलेली श्री धारावी देवीची मूर्ती प्रतिमा भेट म्हणून अर्पण केली. युवा शक्ती प्रतिष्ठान पालघर, गडमाची ट्रेकर्स मुंबई (कुणाल जी किणी), राई गाव दुर्गमित्र (सम्राट राऊत, भरत पाटील) यांनी दुर्गमित्रांना अल्पोहार उपलब्ध करून कार्यक्रम नियोजनात सक्रिय योगदान दिले. यावेळी श्री धारावी देवी इतिहास, धारावी कोटाचा आजवर उपलब्ध झालेला चुकीचा नकाशा, नव्याने संशोधन करून प्रकाशित होणारी कागदपत्रे, दुर्गसंवर्धनाचा प्रवास, नरवीर चिमाजी आप्पांचे काल्पनिक चित्र यावर राऊत यांनी सविस्तर खुलासा केला. ऐतिहासिक झेंडा बुरूजावर (ध्वजस्तंभ) दुर्गमित्रांचे मनोगत व राष्ट्रगीत मानवंदना देऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.

युवा शक्ती प्रतिष्ठान पालघरचे अध्यक्ष प्रशांत रामचंद्र सातवी यांच्या मते “मराठयांच्या वसई विजयाचा महत्वाचा साक्षीदार असणारा जंजिरे धारावी कोट असंख्य संशोधनपर खाणाखुणा बाळगून आहे. गेली अनेक वर्षे विविध माध्यमातून सुरू असणारे विजयदिन पर्व अनेकांना स्फूर्तीदायक ठरले आहे.”

किल्ले वसई मोहिमेचे दुर्गमित्र प्रतिनिधी प्रीतम पाटील यांच्या मते “इतिहास अभ्यास हा मुख्य हेतू लक्षात ठेवून आयोजित करण्यात आलेल्या विजय दिन पर्वाचा दुर्गमित्रांनी प्रत्यक्ष भटकंती अंतर्गत आनंद घेतला. आगामी सर्व किल्ल्यांच्या विजय दिन परंपरा कायमस्वरूपी जपल्या जातील.”

किल्ले वसई मोहिमेचे दुर्गसंवर्धन प्रतिनिधी भरत पाटील यांच्या मते “किल्ले वसई मोहीम अंतर्गत सुरू असणारी गौरवशाली परंपरा, उत्सव, इतिहास मार्गदर्शन सफर, विविध अंगी संशोधन शेकडो दुर्गमित्रांच्या कायमस्वरूपी स्मरणात राहील हा विश्वास आहे. जंजिरे धारावी किल्ल्याच्या विजयदिन पर्वाचा अभिमान आहे.”

Updated : 2022-03-07T21:01:55+05:30

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.