गड्या, कोल्हापूरचा शेतकरी लई भारी ! दूध उत्पादक शेतकऱ्यांचा दुग्ध व्यवसाय ठरतोय रोल मॉडेल

गड्या, कोल्हापूरचा शेतकरी लई भारी ! दूध उत्पादक शेतकऱ्यांचा दुग्ध व्यवसाय ठरतोय रोल मॉडेल

कोल्हापूर – डोंगरकपारीत वसलेली, जवळपास 750 लोकसंख्या वस्तीची वाडी. एक पीक पद्धतीची भातशेती आणि सोबतीला विट भट्टी यावर साऱ्यांची गुजराण. आता वाडीला पाण्याची आणि वाहतुकीची सोय असली तरी पूर्वी पाण्यासाठी वणवण ठरलेली. रस्त्याचा तर ठावठिकाणा नव्हता. मात्र या गावातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी पाच वर्षापूर्वी मोठं धाडस केलं.

फारशा सोयी सुविधा नसणाऱ्या दुर्गम भागातील शेतकरी एकवटले आणि 2017-18 मध्ये हरियाणातून मुऱ्हा जातीच्या म्हैसी खरेदी केल्या. मुऱ्हा जातीच्या म्हैशी कोल्हापुरात फारशा आढळत नाहीत. पण या शेतकऱ्यांनी पुढचं पाउल टाकत 47 म्हैशी आणत दुग्धव्यवसाय वाढविला. पूर्वी ज्या वाडीत 50 लिटर दूध संकलन व्हायचं आता त्या गावातून 570 लिटर दूध संकलन होत आहे.

शेतीला पूरक म्हणून सुरू केलेला पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय आता मुख्य व्यवसाय झाला आहे. करवीर तालुक्‍यातील बेरकळवाडी या डोंगरकपाऱ्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या आत्मविश्वासाने फुलविलेले हे “गोकुळ’ दुग्ध व्यवसायात एक रोल मॉडेल म्हणून नावारुपास आला आहे.

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) या दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठे सहकार्य लाभले. दुर्गम भागातील या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या ही यशोगाथा पाहण्यासाठी “गोकुळ’च्या संपूर्ण संचालकांनी रविवारी (ता.23) बेरकळवाडीला हजेरी लावली. दुर्गम भागातील शेतकऱ्यांनी जपलेले जातिवंत जनावरांचे वैभव पाहून सारेच थक्क झाले.

बेरकळवाडी हे कोल्हापूर शहरापासून जवळपास तीस किलोमीटर अंतरावर आहे. सातेरी मंदिरापासून काही अंतरावर ही वाडी वसलेली. अवतीभवती डोंगर. बीडशेडपासून बेरकळवाडीपर्यंत घाट रस्ता. हा भाग दुर्गम. पूर्वी वाडीला जायचे तर चालत. पाण्याची सोय नव्हती. आता वाडीमध्ये विहिरी, बोअरिंगची सुविधा आहे. आता डांबरी रस्ता आहे. संपूर्ण वाडीचा व्यवसाय हा भातशेती आणि विटभट्टीचा. काहींनी जनावरे पाळलेली.

बेरकळवाडीत सगळयांचे मिळून 50 लिटर दूध संकलन होई. बेरकळवाडीतील सगळे कष्टकरी एकवटले आणि 2017-18 मध्ये हरियाणातून मुऱ्हा जातीच्या म्हैशी खरेदी केल्या. प्रत्येक गोठ्यात एक जातिवंत म्हैस आहे. हरियाणातून आणलेल्या 47 म्हशीया तिसऱ्या वेतात गाभण गेलेल्या आहेत. गोठयातच तयार झालेल्या रेड्या 39 आहेत. वासरु संगोपन योजनेतून 39 रेड्या तयार झाल्या आहेत. संगोपन व्यवस्थापन योग्यरित्या केल्यामुळे प्रती जनावर सरासरी 11 ते 14 लिटर दुधाचे उत्पादन होते. प्रत्येक वेतातील दुधाची सरासरी 2200 ते 2400 लिटर आहे.

बेरकळवाडीत सह्याद्री, जयादेवी पी.पाटील दूध संस्था, विलासराव देशमुख दूध संस्था, शिवशक्ती दूध संस्था, संतराम दूध संस्था आणि वि.ना.पाटील दूध संस्था आहेत. या सहा दूध संस्थांचे मिळून 570 लिटर दूध संकलन होते. यामध्ये म्हैशीच्या दुधाचे संकलन 480 लिटर तर गाय दूध संकलन 90 लिटर आहे.
.
अध्यक्षांनी दिली गावकऱ्यांना शाबासकीची थाप
“गोकुळ’चे चेअरमन विश्वास पाटील यांनी संचालकांसहित बेरकळवाडीला भेट देउन दूध उत्पादकांशी संवाद साधला. शेतकऱ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली. काही जणांचा सत्कार केला. बेरकळवाडीतील शेतकऱ्यांच्या धाडसाचे कौतुक वाटते. हरियाणातून मुऱ्हा जातीच्या म्हशी आणल्या.उत्तम संगोपन केले. दुधाचे उत्पादन वाढविले. बेरकळवाडीतील शेतकऱ्यांचे कष्ट, जिद्द आणि वेगळे काही तरी करुन दाखविण्याची जिगर पाहिली की निश्‍चितच येत्या काही काळात या गावातून रोज 1400 लिटर दूध संकलनपर्यंत व्याप्ती वाढेल. बेरकळवाडीतील दूध उत्पादकांना गोकुळकडून सर्वतोपरी सहकार्य करू.”गोकुळ’व्यवस्थापन म्हैस दूध उत्पादन वाढीसाठी प्रयत्नशील आहे.’असे चेअरमन पाटील यांनी सांगितले. तसेच या गावांशी निगडीत जुन्या आठवणी जागविल्या.

 


Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.