किफायतशीर इलेक्ट्रिक दुचाकी उपलब्ध करणार- सुलज्जा फिरोदिया

मुंबई – भारतामध्ये इलेक्ट्रिक वाहन खरेदी वाढणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना परवडतील अशा इलेक्ट्रिक दुचाकी बाजारात उपलब्ध करण्याचा आमचा प्रयत्न आहे असे कायनेटिक ग्रीन या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सुलज्जा फिरोडिया माटवानी यांनी सांगितले.
नव्या दुचाकी विकसित करण्यासाठी कायनेटिक ग्रीन कंपनीने चीनमधील या क्षेत्रातील बलाढ्य एआयएमए टेक्नॉलॉजी समुहाबरोबर सहकार्य करार केला आहे. कायनेटिक ग्रीन पुढील दोन वर्षांमध्ये या संयुक्त प्रकल्पाच्या माध्यमातून पाच लाख इलेक्ट्रिक दुचाकी तयार करण्याचा प्रकल्प विकसित करणार आहे. पुढील वर्षी किमान तीन नव्या इलेक्ट्रिक दुचाकी भारतीय बाजारपेठेत सादर करण्यात येणार आहेत.
चार वर्षापूर्वी कायनेटीक ग्रीनने भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक तीन चाकी वाहने सादर केली होती. इंधनाचे दर वाढत असताना इलेक्ट्रिक वाहनांना सरकारकडून चालना मिळत असल्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांची विक्री वाढणार असल्याचे कायनेटिक ग्रीन कंपनीला वाटते.
सुलज्जा यांनी सांगितले की, आम्ही भारतीय ग्राहकांना कमी किमतीत जागतिक पातळीवरील दर्जेदार इलेक्ट्रिक दुचाकी उपलब्ध करण्याचा प्रयत्न करणार आहोत. इलेक्ट्रिक वाहन निर्मिती बरोबरच त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यात आम्ही पुढाकार घेणार आहोत. त्यामध्ये चार्जिंग, बॅटरी इत्यादीचा समावेश आहे. एआएमए ही कंपनी शांघाय शेअर बाजारावर नोंदली गेली असून या कंपनीची उत्पादने 87 देशात विकली जातात.