कवठेकर यांना उत्कृष्ट अध्यापक पुरस्कार

वणी
जैताई देवस्थान वणी शिक्षण समिती द्वारा दरवर्षी मामा क्षीरसागर स्मृतीदिनी दिला जाणारा प्रा. राम शेवाळकर स्मृती उत्कृष्ट अध्यापक पुरस्कार या वर्षी विवेकानंद विद्यालय यवतमाळ येथील अध्यापक विवेक कवठेकर यांना दिला जाणार असल्याचे देवस्थानचे अध्यक्ष नरेंद्र नगरवाला व सचिव माधव सरपटवार ह्यांनी जाहीर केले आहे.
या पुरस्काराचे हे चौथे वर्ष असून पुरस्काराचे स्वरुप २५०० रुपये रोख , स्मृतिचिन्ह आणि शाल व श्रीफळ असे आहे.
कवठेकर यांना हा पुरस्कार बुधवार दि. ६ एप्रिल रोजी रात्री ७.३० वाजता जैताई मंदिराच्या प्रांगणात समारंभपूर्वक दिला जाणार आहे. कवठेकरांची ज्ञाननिष्ठा ,विद्यार्थीनिष्ठा व समाजनिष्ठा विचारात घेऊन आणि त्यांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्याच्या गौरवार्थ त्यांना हा पुरस्कार प्राचार्य प्रसाद खानझोडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
पुरस्कार प्रदान समारंभा नंतर विवेक कवठेकर यांचे ‘ नित्यनूतन राम ‘ या विषयावर व्याख्यान होईल. व्याखानाचे आयोजन नगर वाचनालयाने हेमंत व्याख्यानमाले अंतर्गत केले असून व्याख्यान विदर्भ साहित्य संघाच्या स्थानिक शाखेच्या वतीने प्राचार्य राम शेवाळकर स्मृती निमित्त प्रायोजित आहे. वणीकरांनी बहुसंख्येने या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा अशी विनंती आयोजकांनी केली आहे. ————————————————–