अमर जवान ज्योतीचे विलीनीकरण हा इतिहास संपविण्याचा प्रयत्न शेतकरी नेते सिकंदर शहा यांची टिका

प्रतिनिधी यवतमाळ
भारताने १९७१ च्या युद्धात पाकिस्तानचा पराभव केल्यानंतर, ‘अमर जवान ज्योत’हे भारतीय जवानांच्या सर्वोच्च बलिदानाचे स्मारक म्हणून उभारले गेले होते. २६ जानेवारी १९७२ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या स्मारकाचे उद्घाटन केले. या स्मारकाच्या निमित्ताने इंदीरा गांधी यांची आठवण काढली जात होती. त्यामुळेच केन्द्रातील भाजपा सरकारने अमर जवान ज्योतीचे विलीनीकरण केले असून हा भारताचा गौरवशाली इतिहास संपविण्याचा प्रयत्न असल्याची टिका शेतकरी वारकरी संघटनेचे अध्यक्ष, शेतकरी नेते सिकंदर शहा यांनी केली आहे.
अमर जवान ज्योत इंडिया गेटच्या खाली प्रज्वलीत करण्यात आली होती. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात बांगलादेश वेगळा करण्यात आला. यातील शहीद जवानांची आठवण म्हणून इंडिया गेटखाली अमर ज्योत प्रज्वलित करण्याचा निर्णय झाला होता. गेल्या ५० वर्षांहून अधिक काळापासून इंडिया गेटवर प्रज्वलित असलेली ‘अमर जवान ज्योत आता राष्ट्रीय युद्ध स्मारकात विलीन करण्यात आली. वास्तविक देशात अनेक शहीद स्मारके आहेत. या स्मारकापासून नागरीकांचे आत्मबल वाढण्यास मदत होते. त्यामुळे अमर जवान ज्योत तसेच राष्ट्रीय युध्द स्मारक दोन्ही अस्तित्वात राहील्यास मनोबल उंचविण्यासाठी परीणामकारक ठरले असते. मात्र मोदी सरकारने जाणीवपुर्वक इंदीरा गांधी यांचे शौर्य तसेच त्यांच्या आठवणी पुसून काढण्यासाठी या स्मारकाचे विलीनीकरण केल्याचा आरोप सिकंदर शहा यांनी केला आहे. या दोन्ही स्मारकांमधील अंतर हे अर्धा किमी आहे. २५ फेब्रुवारी २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकाचे लोकार्पण केले. १९२१ मध्ये इंग्रजांनी इंडिया गेट बांधले होते. पहिल्या विश्व युद्धात 84,000 सैनिकांच्या आठवणीत हे स्मारक बांधण्यात आले. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात बांगलादेश वेगळा करण्यात आला. या युद्धात अनेक वीर जवानांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले होते. या युद्धातील 3,843 शहीद जवानांची आठवण म्हणून इंडिया गेटखाली अमर ज्योती प्रज्वलित करण्याचा निर्णय झाला. अमर जवान ज्योतीमुळे प्रामुख्याने इंदीरा गांधी यांचे नाव घेतले जात होते. त्यामुळे आता ही ज्योत नरेंन्द्र मोदी यांच्या कार्यकाळात बांधलेल्या राष्ट्रीय युध्द स्मारकात विलीन करण्यात आली. हा सर्व प्रकार अत्यंत दुर्देवी असून मोदी सरकारच्या या निर्णयाचा सिकंदर शहा यांनी निषेध केला आहे. राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या उभारणीपूर्वी प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती, लष्करप्रमुख आणि पाहुणे प्रतिनिधी अमर जवान ज्योती येथेच शहीद जवानांना श्रद्धांजली वाहत होते. परंतु नंतर ही संपूर्ण प्रक्रिया राष्ट्रीय युद्ध स्मारकाकडे वळवण्यात आली. असे असूनही इंडिया गेट येथील अमर जवान ज्योती येथे मोठी गर्दी जमायची. ही गर्दी सुध्दा मोदी सरकारला खुपत होती, त्यामुळेच अमर जवान ज्योतीचे विलीनीकरण केल्याचा आरोप सिकंदर शहा यांनी केला आहे.
राजकीय पक्षांची चुप्पी खेदजनक
इंडिया गेटवरील अमर जवान ज्योत स्वातंत्र्यानंतर झालेल्या विविध युद्धांमध्ये आणि संघर्षांमध्ये देशासाठी शहीद झालेल्या जवानांप्रती कृतज्ञता आणि आदरांजलीचे प्रतीक होती. असे असतांनाही जाणीवपुर्वक मोदी सरकारने या ज्योतीचे विलीनीकरण केले. देशातील राजकीय पक्ष याला प्रखर विरोध करतांना दिसून येत नाही. ही खेदाची बाब असल्याचे सिकंदर शहा यांनी म्हटले आहे.