अबाऊट टर्न : धूळदाण

अबाऊट टर्न : धूळदाण

हिमांशू

धुकं आणि धूर यांच्या जोडीला धूळ आली आणि हवेची गुणवत्ता खूपच खालावली. मुंबईत प्रदूषणाचा स्तर 387 म्हणजे “अतिधोकादायक’ श्रेणीत पोहोचला. काही ठिकाणी तर तो 570 च्या पुढे गेला. दृश्‍यमानता खूपच कमी झाली. अर्ध्या किलोमीटरवरचं नीट दिसेना. पाकिस्तानातून आलेलं धुळीचं वादळ कच्छमार्गे मुंबई आणि कोकणात धडकलं. कोविडचं संकट असतानाच हे नवं संकट येऊन कोसळलं. अर्थात, याही स्थितीत आमच्या महाराष्ट्रात राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी जराही विश्रांती घेतली नाही, याचा खरंतर आपल्याला अभिमान असायला हवा. अर्थात, हे काही नवीन नाही.

कोविडकाळात वादळं, चक्रीवादळं, गारपीट, पूर, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस अशा अनेक आपत्ती आल्या आणि गेल्या. अर्थातच, निराश होऊन गेल्या. घाबरणारं कुणी नसेल तर घाबरवण्यात काय हशील? महाराष्ट्र आपत्तींना कधीच घाबरला नाही. राजकारणी मंडळी तर नाहीच नाही! उलट प्रत्येक आपत्तीनं राजकीय मंडळींना एकमेकांवर दुगाण्या झाडण्यासाठी नव्यानं बळ दिलं. कालपरवाच्या धुळीच्या वादळानंसुद्धा सर्व मान्यवरांना “धूळफेक करण्याची’ आणि “माती खाण्याची’ यथेच्छ संधी दिली. काहीही झालं तरी युद्ध सुरू राहायलाच पाहिजे आणि राजकीय हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक सतत बिघडलेलाच असला पाहिजे, अशी शपथच घेतली असेल तर प्रदूषण बिचारं करून करून किती नुकसान करणार? श्‍वासनलिकेच्या आणि फुफ्फुसांच्या विकारांनी ग्रस्त झालेल्या रुग्णांनाच फक्‍त त्रास होणार!

बाहेर प्रदूषण असेल तर आम्ही दिवसभर बंद खोलीत राहू. पण टीव्हीवर मात्र राजकीय प्रदूषणच दिसायला हवं. खरंखुरं प्रदूषण दाखवलं तर घरातल्या घरात आम्हाला गुदमरून टाकण्यासाठी केलेला तो कट ठरेल. आम्ही गुदमरू; पण घाबरणार नाही. हवामान बदल, जलवायू परिवर्तन, जागतिक तापमानवाढ वगैरे बोजड शब्दांचा बागुलबुवा दाखवून कुणीही आम्हाला भीती घालण्याचा प्रयत्न करू नये. एल नीनो वगैरे बकवास तर नकोच नको! संकट नैसर्गिक आहे की मानवनिर्मित, अशा फुटकळ चर्चांमध्ये आम्हाला काडीचा इंटरेस्ट नाही. “पुढील पिढ्यांचा विचार करा,’ असा फुकटचा सल्लाही कुणी आम्हाला देऊ नये. या जगात पैसा जवळ असला की सबकुछ मिळतं.

पुढील पिढ्यांसाठी रग्गड पैसा कमावून ठेवणं हीच सर्वांत महत्त्वाची बाब आहे. आमची पिढी पाणी विकत घेतेय; पुढची पिढी हवा विकत घेईल. झालीच जगबुडी तर सगळे एकदम मरू. एकटे आम्ही मरणार आहोत का? जे सगळ्यांचं होईल तेच आमचं होईल. या आपत्तींची पण कमाल आहे राव! दरवेळी वेगवेगळी रूपं घेऊन येतात. अतिवृष्टी, पूर वगैरे जुन्यापुराण्या आपत्तींना आम्ही भीक घालत नाही म्हणून आता पिवळा पाऊस, धुळीचं वादळ वगैरे भलत्याच आपत्ती यायला लागल्यात.

पण तरीही, कोणतंही धुळीचं वादळ धूळफेक करण्यात आमच्या आदरणीय नेत्यांची बरोबरी करू शकत नाही. तोंडात माती गेली तरी त्यांची तोंडं बंद होणं शक्‍य नाही. थंडीच्या कितीही लाटा आल्या तरी आमच्याकडे येणाऱ्या राजकीय लाटांपुढे भुईसपाट होऊन जातात. निसर्ग, त्योक्‍ते वगैरे वादळांपेक्षा मोठी वादळं निर्माण करण्याची ताकद आमच्या नेतेमंडळींच्या वक्‍तव्यांत आहे. राजकीय हरितगृह वायूंपुढे प्रदूषणही हात टेकतं. धुळीचं वादळसुद्धा या धुळवडीपुढे अखेर धुळीला मिळालंच!

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.