अन्यायग्रस्त प्रस्तावाच्या विरोधात नवरंग नगरवासियांची जिल्हाधिका-यांकडे धाव

प्रतिनिधी यवतमाळ
नवरंग नगरातील मंजुर लेआऊट मधील रस्त्याच्या जमिनीचा कृषक सातबारा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. असा निर्णय झाल्यास नवरंग नगराकडे जाण्यासाठी रस्ताच अस्तित्वात राहणार नसल्याने परीसरातील नागरीक संतप्त झाले आहे. दरम्यान या परीसरातील नागरीकांनी जिल्हाधिका-यांकडे धाव घेतली असून प्रत्यक्ष मोक्का पाहणी करुन न्याय देण्याची मागणी केली आहे.
यवतमाळ ते चौसाळा – किटा कापरा हा रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग क्र ९५ असून या रस्त्याची लांबी १५ किमी आहे. या प्रमुख जिल्हा मार्गावर मौजे वाघापूर गावाजवळ श्री काशीकर महाराज देवस्थानाजवळ मंजुर रस्त्याची रुंदी १८ मीटर (६० फुट आहे. या रस्त्याच्या दोन्ही बाजुचे लेआउट (8/1अ, 8/1ब, 8/1, व 9/1) जिल्हाधिकारी यांचे कडून सन 1986 ते 1996 दरम्यान मंजूर करण्यात आले आहे. या परीसरात भूखंड विक्री होऊन मोठ्या प्रमाणात नागरिकरण सुध्दा झाले आहे. दरम्यान उपविभागीय अधिकारी यवतमाळ यांनी दि. 23.12-2021 रोजी यवतमाळ – बोदड – चौसाळा या अस्तित्वात असलेल्या रस्त्याची अकृषक झालेली जमीन 0.21 आर कमी करून कृषक 7/12 देण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयास सादर केला आहे. सदर प्रस्ताव सादर करतांना उपविभागीय अधिकारी यवतमाळ यांनी आक्षेपांचा कुठलाही विचार केलेला नाही. सदर प्रस्ताव मंजूर झाल्यास, काशीकर महाराज समाधीकडे व ‘नवरंग नगरला जाणारा 9 मीटरचा अॅप्रोच रस्ता बंद होणार आहे. असे झाल्यास उत्तरमुखी ‘नवरंग नगर’ लेआऊटचे प्लॉट क्र 2 ते 9 ची वहीबाट पूर्णपणे बंद होणार आहे. त्यामुळे यवतमाळ बोदड- चौसाळा रोड’ व ‘नवरंग नगर बचाव संघर्ष समितीने जिल्हाधिकारी यांना दि. 4 मार्च 2022 रोजी लेखी निवेदन सादर करुन न्याय देण्याची मागणी केली आहे. याबाबत दि 8 मार्च 2022 रोजी उपजिल्हाधिकारी (महसूल) यांचेकडून सुनावणी नियोजित आहे व सदर प्रकरणी अन्यायग्रस्त नागरिकांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांचेकडून प्रत्यक्ष मोका पाहणी व फेर सुनावणी होऊन न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
भूमि अभिलेखची संशयास्पद भूमिका
या प्रकरणात भूमि अभिलेख विभागाची संशयास्पद भूमिका समोर आली आहे. या विभागाने 5 डिसे 2020 रोजीच्या संयुक्त मोजणी वेळेस रस्त्यालगत संबंधित प्लाट धारकांना व नवरंग नगर मधील रहिवाशांना नोटीस न बजावता अंधारात ठेवले. एवढेच नव्हे तर याठिकाणी जिल्हाधिका-यांनी वरील चार लेआऊट मध्ये मंजुर केलेला साठ फुटाचा रस्ता न दाखविता हेतुपुरस्पर माहिती लपविण्याचा प्रयत्न केला आहे. हा रस्ता मंजुर लेआऊट मध्ये नोंद आहे. या लेआऊट बाबत जिल्हाधिका-यांनी लागु केलेल्या अटी व शर्थींना दुर्लक्षीत करुन नवरंग लेआऊट च्या शेजारी असलेल्या लेआऊट धारकाला मदत पोहोचविण्याच्या उद्देशाने भूमि अभिलेख विभागाने प्रयत्न चालविले आहे. यवतमाळ – बोदड – चौसाळा मंजुर रस्त्याच्या मधून 70 मीमी रुंदीची पाणी पुरवठा लाईन, विद्युत लाईन व मलनिस:रणाच्या पाईप लाईनस् गेलेल्या आहेत. त्यामुळे मंजुर असलेल्या रस्त्याच्या जमीनीचा कृषक 7/12 देण्याबाबतचा प्रकार अनाकलनीय असून संबंधित अन्यायग्रस्त नागरिक न्यायाची अपेक्षा व्यक्त करीत आहेत.