अखेर एअर इंडिया टाटा समुहाच्या ताब्यात; सरकारला मिळाले ‘इतके’ कोटी

अखेर एअर इंडिया टाटा समुहाच्या ताब्यात; सरकारला मिळाले ‘इतके’ कोटी

नवी दिल्ली – टाटा समूह आणि केंद्र सरकार यांच्यात झालेल्या शेवटच्या प्रक्रिया फेरीनंतर आता एअर इंडियावर टाटांची मालकी प्रस्थापित झाली आहे. ही प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन चर्चा केली.

एअर इंडिया कर्जबाजारी झाल्यानंतर सरकारने एअर इंडियामधून 100 टक्के निर्गुंतवणुकीचा निर्णय घेतला. टाटा सन्सने यासाठी लावलेली 18 हजार कोटींची बोली अखेर अंतिम करण्यात आली. एअर इंडियावर 15 हजार 300 कोटींचे कर्ज होते. या कर्जाची रक्कम वगळता उरलेले 2 हजार 700 कोटी रुपये रोख स्वरूपात केंद्र सरकारला अदा करण्यात आले.

केंद्र सरकारने आपले 100 टक्के शेअर्स टाटा सन्सच्या टेलेस प्रायव्हेट लिमिटेडकडे हस्तांतरीत केले. आता टाटा सन्सला देशांतर्गत 4,400 आणि आंतरराष्ट्रीय 1,800 उड्डाणांचे व पार्किंग जागांचे नियंत्रण मिळणार आहे. परदेशात पार्किंगचे 900 स्लॉट मिळणार आहेत. मालवाहतूक आणि विमानतळांवरील इतर सेवांत टाटा समूहाला 100 टक्के तसेच 50 टक्के वाटा मिळणार आहे.

जेआरडी टाटा यांनी 1932 मध्ये टाटा एअरलाइन्स या विमान कंपनीची स्थापना केली. 17 ऑक्‍टोबर 1932 रोजी कराचीहून मुंबईला या कंपनीच्या विमानाचे पहिले उड्डाण झाले. 1946 मध्ये टाटा सन्सने त्याचे विभाजन करून 1948 मध्ये एअर इंडिया आणि युरोपातील उड्डाणांसाठी एअर इंडिया इंटरनॅशनल अशा दोन कंपन्या स्थापन केल्या. ही खासगी-सरकारी भागीदारीतील पहिली विमान कंपनी होती. त्यात टाटांचा वाटा 25 टक्के होता तर सरकारचा वाटा 49 टक्के होता. उर्वरित वाटा नागरिकांचा होता.

1953 मध्ये एअर इंडियाचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. तेव्हापासून ही विमान कंपनी केंद्र सरकारच्या अखत्यारीत होती. मात्र, गेल्या काही वर्षांत एअर इंडियाच्या तोट्यात वाढ झाली. त्यामुळे ही कंपनी पुन्हा खासगी क्षेत्रात विकण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. करोना साथीमुळे जानेवारी 2020 मध्ये एअर इंडियाच्या विक्री प्रक्रियेस विलंब होत होता. या वर्षी पुन्हा एप्रिलमध्ये ही प्रक्रिया सुरू झाली. टाटा समूहाने डिसेंबर 2020 मध्येच ही कंपनी खरेदी करण्याचा इरादा व्यक्त केला होता. आज ती प्रक्रिया पूर्ण झाली.

एअर इंडियासाठी बॅंका टाटा समूहाला मदत करणार
नवी दिल्ली, दि.27- एअर डंडियाचे व्यवस्थापन आता टाटा समूहाकडे आले आहे. तोट्यात चालत असलेल्या एअर इंडियाला आगामी काही काळ चालवण्यासाठी स्टेट बॅंक आणि इतर बॅंका टाटा समूहाला कर्जपुरवठा करणार आहेत.

टाटा समुहाला यासाठी खेळते भांडवल आणि मुदत कर्जासाठी स्टेट बॅंकेसह पंजाब नॅशनल बॅंक, बडोदा बॅंक, युनियन बॅंक ऑफ इंडिया कर्जपुरवठा करणार असल्याचे सांगितले जाते. एअर इंडियावर मोठ्या प्रमाणात कर्ज होते. त्यातील 15 हजार 300 कोटी रुपयाचे कर्ज टाटा समूहाने स्वतःकडे घेतले आहे व सरकारला 2 हजार 700 कोटी रुपये रोख देऊन ही कंपनी ताब्यात घेतली आहे. आता एअर इंडिया शिवाय टाटा समुहाकडे दोन विमान कंपन्या आहेत. त्यामध्ये विस्तार व एअर एशिया या कंपन्यांचा समावेश आहे. 2007-8 मध्ये एअर इंडिया आणि इंडियन एअरलाईन्सचे विलीनीकरण केले होते. त्यानंतर विमान कंपनी तोट्यात चालत होती. त्यानंतर केंद्र सरकारने ही विमान कंपनी खाजगी समूहाला विकण्याचा निर्णय घेतला होती.

एअर इंडियाचा कारभार सुधारणार: चंद्रशेखरन
नवी दिल्ली – टाटा समूहाने आज एअर इंडिया या सरकारी कंपनीची मालकी स्वत:कडे अधिकृतरीत्या घेतली. या कंपनीचा कार्यभार सुधारणार असून कंपनीला जागतिक दर्जाची नागरी विमान वाहतूक कंपनी बनविण्याचा आमचा संकल्प आहे असे टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी सांगितले.

चंद्रशेखरन यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा केली. भारत सरकार आर्थिक सुधारणा करण्याबाबत कटीबद्ध आहे. भारतातील उद्योजकांना योग्य वातावरण निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळेच एअर इंडियाची विक्री झाली असल्याचे टाटा समूहाने म्हटले आहे.

चंद्रशेखर यांनी सांगितले की, एअर इंडियातील कर्मचाऱ्यांचे टाटा समूहातर्फे स्वागत करीत आहोत. आगामी काळामध्ये संयुक्तपणे ही कंपनी जागतिक पातळीची करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. भारतातील सर्वसामान्य लोकांना विमानाने प्रवास करता आला पाहिजे. त्याचबरोबर विमान प्रवास सुकर झाल्यानंतर त्याचा उद्योग व्यवसायावर सकारात्मक परिणाम होत असतो. त्यामुळे भारतातील नागरी विमान वाहतूक क्षेत्र विस्तारित होण्याची गरज आहे.आम्ही त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार असल्याचे चंद्रशेखर यांनी सांगितले.

Shubham Gote

Mr. Shubham Gote is involved in the day-to-day operations of the company along with the business expansion strategies of the print media division of the group. He also supervises the performance of the company in terms of the business plans. He has been on the Board of the Company since November 2009.

Leave a Reply

Your email address will not be published.